धामणगाव रेल्वे सामाजिक

धामणगावात हजारों भाविकांनी ईदगाहवर नमाज अदा करीत ईद-उल-फितर केली उत्साहात साजरी

धामणगाव रेल्वे 

शहरात ईद-उल-फितरचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी उसळली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करून नमाज अदा करण्यासाठी ईदगाहवर दाखल झाले होते. ईदगाहवर नमाज जामा मस्जिद चे इमाम हाफिज अख्तर यांच्या नेतृत्वात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने अदा करण्यात आली. नमाजपूर्वी त्यांनी आपल्या भाषणात रमजानमधील रोजांच्या महत्त्वाबाबत, मानवतेचे मूल्य, परस्पर प्रेम आणि भाईचाऱ्याचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, ईद हा केवळ आनंदाचा सण नसून गरजूंना मदत करण्याचा, मतभेद विसरून एकमेकांच्या जवळ येण्याचा दिवस आहे. नमाजनंतर देशात शांतता, सौहार्द, प्रगती आणि एकतेसाठी विशेष दुआ करण्यात आली. देशात भाईचारा कायम राहावा आणि समाजात सलोखा टिकून राहावा यासाठी सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली. यानंतर ईदगाह परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वांनी एकमेकांना मिठी मारून “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या आणि गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला; ईदी मिळाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता..

  ठाणेदार गिरीश ताथोड ईद च्या शुभेच्छा देताना 

या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीष ताथोड यांच्या नेतृत्वामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलिस बंदोबस्त तसेच वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यात आली, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला. ईदच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी दिसून आली. मिठाई, शेवया आणि कपड्यांच्या दुकानांवर ग्राहकांची वर्दळ वाढली होती. संपूर्ण शहरात सणाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. अशा प्रकारे धामनगावात ईद-उल-फितरचा सण प्रेम, एकता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत उत्साहात साजरा करण्यात आला..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!