अमरावती

५० पेक्षा अधिक प्लॉटधारकांची पोलीस आयुक्तांकडे धाव !

शेतजमिनीतील प्लॉट नांगरल्याचा आरोप करीत प्रतिबंधक कारवाईची मागणी

अमरावती प्रतिनिधी

अंजनगाव बारी रोड परिसरातील म्हसला येथील खासगी लेआउटमधील प्लॉट ट्रॅक्टरने नांगरून प्लॉट व रस्त्यांच्या खुणा नष्ट केल्याचा आरोप करत ५० पेक्षा जास्त प्लॉटधारकांच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे प्रतिबंधक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार तुषार विजय कुळकर्णी यांनी दिलेल्या अर्जानुसार, सर्व्हे क्रमांक ४/१/२ व ३/१ मधील प्लॉट क्रमांक ११५ सहित अनेक प्लॉट सन २००० पासून विविध व्यक्तींच्या नावावर खरेदी करण्यात आले असून संबंधित मालमत्तेचा ताबा प्लॉटधारकांकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अर्जात म्हटले आहे की, २९ मे २०२६ रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास रामेकर नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपूर्ण लेआउट नांगरून प्लॉट व रस्त्यांच्या सीमाखुणा नष्ट केल्या. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मालकीच्या फार्महाऊसवर रात्री मुक्काम करणेही बंद करावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी संबंधित व्यक्ती जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याच्या तयारीत असल्याची शंका व्यक्त केली असून, या प्रकरणात दिवाणी व फौजदारी कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे अर्जात नमूद केले आहे.

दरम्यान, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोणतीही मालमत्तेची किंवा जिवितहानी होऊ नये, यासाठी संबंधित व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश सिटी कोतवाली व बडनेरा पोलीस ठाण्यांना द्यावेत, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही अपेक्षित आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!