महाराष्ट्र

SBI बँक दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला बडतर्फ पीएसआय!

जेलमध्ये आखला दरोड्याचा कट; १६ लॉकर फोडून पसार

जळगाव : प्रतिनिधी 

           एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाला शोभेल असा थरार… आधी कारागृहात ओळख, त्यानंतर तिथेच दरोड्याचा कट आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर थेट बँकेवर धाड… जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँकेत झालेल्या दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या दरोड्याचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शंकर जासक याने २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँकेत आपल्या शालकाच्या मदतीने तब्बल ३.१७ कोटी रुपयांचा दरोडा टाकला होता. या गुन्ह्यानंतर तो कारागृहात होता. साधारण दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसरीकडे, गजानन राजेंद्र पवार हा २०२४ मध्ये चाळीसगाव शहरालगत अनैतिक संबंधातून आपल्या प्रेयसीच्या पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तोही साधारण दीड महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता.
जळगाव मध्यवर्ती कारागृहात असतानाच शंकर जासक आणि गजानन पवार यांची ओळख झाली. याच ओळखीतून दोघांनी एकत्र येत टोळी तयार करण्यासह दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. त्यानुसार दोघांनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेत भोकर येथील स्टेट बँक लक्ष्य केली.

बँकेतील तब्बल १६ लॉकर उघडले

दरोड्याच्या दिवशी चारही आरोपींनी भोकर येथील स्टेट बँकेत प्रवेश केला. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील मॅनेजर आणि कॅशियरला धमकावले. दोघांच्या डोक्याला पिस्तूल लावत बँकेतील तब्बल 16 लॉकर उघडायला लावले. त्यातील सोने बॅगांमध्ये भरून आरोपींनी पोबारा केला.

आरोपींनी कसा टाकला दरोडा?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तब्बल ४० ते ४५ मिनिटे बँकेत होते. पाच ते सहा बॅगा भरून त्यांनी सोने आणि रोकड नेल्याची माहिती आहे. दरोड्यानंतर शंकर जासक आणि गजानन पवार धरणगावच्या दिशेने पळाले. दरम्यान, भोकरमधील ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला होता. जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आली होती. पळून जाताना चावलखेड्याजवळ आरोपींनी त्यांच्या जवळील चार बॅगा रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्या. चावलखेडा जवळ बॅगा पडल्याची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले.

१५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त

ग्रामस्थांकडून आरोपींच्या पळून जाण्याच्या दिशेची माहिती घेत त्यांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर शंकर जासक आणि गजानन पवार हे दोघे एका शेतात लपून बसलेले असताना पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. या दरोड्याप्रकरणी शंकर जासक आणि गजानन पवार यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साधारण १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे.
भोकरमधील दरोड्याची चर्चा आता जिल्हाभर रंगली
पोलीस चौकशीत शंकर जासक आणि गजानन पवार यांनी कारागृहातील ओळखीपासून दरोड्याच्या नियोजनापर्यंतचा घटनाक्रम सांगितल्याची माहिती आहे. मात्र, या दोघांसोबत असलेल्या अन्य दोन आरोपींची पार्श्वभूमी काय? त्यांची या टोळीत कशी एन्ट्री झाली? आणि दरोड्यात नेमकी किती रोकड व किती सोने लंपास झाले? याचा तपास अद्याप सुरू आहे. कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग आणि थेट बँकेवर दरोडा… या संपूर्ण प्रकरणामुळे भोकरमधील दरोड्याची चर्चा आता जिल्हाभर रंगली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!