महाराष्ट्र

स्वतःला सिंघम समजणारा तहसीलदार निघाला महालाचखोर ; ६ लाख ४० हजार रुपये घेताना अटकेत

गलेलठ्ठ पगार, तरीही वर कमाईचा मोह आवरेना

प्रतिनिधी

प्रामाणिकपणाचा दिखावा करीत नेहमी कारवायांचा धडाका उडवून चर्चेत राहणारा अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण अखेर वाळूच्या नादात फसला. बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले आणि पथकाने शनिवारी (ता. ६) सायंकाळी चव्हाण यास तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
तक्रारदाराच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर जप्तीची कारवाई न करण्यासाठी आणि ६ हायवा गाड्या विनातक्रार सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार चव्हाण याने तब्बल ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. शासकीय पदाचा रुबाब दाखवून दरमहा खंडणी उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार होता. त्रासलेल्या तक्रारदाराने थेट बीड एसीबीकडे धाव घेतली.
उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आधी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत ६ लाख ४० हजार रुपयांचा आकडा ठरला. शनिवारी सायंकाळी पैसे घेण्याचे निश्चित होताच एसीबीच्या पथकाने अचूक सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताच तहसीलदार विजय चव्हाण याला अधिकाऱ्यांनी पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

एसीबीचा अचूक वेध आणि सुपर सापळा

तक्रारदार या जाचाला कंटाळला होता. त्याने थेट बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने अत्यंत गुप्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला. एसीबीच्या पथकाने आधी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात ‘साहेब’ दोषी आढळले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी तडजोड झाली आणि आकडा ६ लाख ४० हजार रुपयांवर फायनल झाला. शनिवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे रक्कम सुपूर्द केली जात असतानाच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घातली आणि तहसीलदार विजय चव्हाण याच्या मनगटात कायद्याच्या बेड्या ठोकल्या.

‘या’ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाई

बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखलेल्या या सापळ्यात लाचखोर तहसीलदाराला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. या धडक मोहिमेत त्यांच्यासोबत पथकातील अंमलदार बीडकर (हवालदार), खारसडे (हवालदार), पुरी (पोलिस नाईक/कॉन्स्टेबल), सुरवसे (पोलिस नाईक/कॉन्स्टेबल) आणि पुरी यांनी कारवाई केली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!