प्रशासन कार्यवाही

१० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

लाचलुचपत विभागाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर :

वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक विजयकुमार क्षीरसागरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज, बुधवारी दुपारी जरूळ फाटा येथे सापळा रचून करण्यात आली. तक्रारदार हे भायगावचे उपसरपंच असून त्यांच्या गावी स्मशानभूमीचे काम जनसुविधा योजनेअंतर्गत पूर्ण झाले आहे. या कामासाठी मंजूर झालेल्या ६ लाख ९६ हजार रुपयांच्या बिलांपैकी उर्वरित ९४ हजार रुपये अदा करण्यासाठी आवश्यक एनओसी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सादर केली होती. मात्र, ग्रामसेवक विजयकुमार क्षीरसागर याने या उर्वरित रकमेसाठी चेकवर सही करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार देत थेट छत्रपती संभाजीनगरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ जून रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १८ जून रोजी पंचासह झालेल्या चर्चेत आरोपीने तडजोडीत १० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज तक्रारदारांनी ग्रामसेवक क्षीरसागरने सांगितल्यानुसार जरूळ फाट्यावरील चैतन्य टी हाऊस येथे भेट दिली. क्षीरसागरने तक्रारदाराकडून दहा हजार रुपये पंचसाक्षीदारांसमक्ष स्वीकारले. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीला लाचेसह अटक केली.
कारवाईदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल, पाकीट, ओळखपत्रे, ७०० रु रोख रक्कम व दुचाकी चावी जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पो. उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वात पोह. राजेंद्र सिनकर, पोअं. विलास चव्हाण आणि सी.एन. बागुल यांच्या पथकाने केली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!