प्रशासन कार्यवाही यवतमाळ

१७ गंभीर गुन्हे, २५ हजार बक्षीस असलेल्या लॉरेंस बिष्णोई गॅंग चा सदस्याला यवतमाळातून अटक

यवतमाळ : प्रतिनिधी 

अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना यवतमाळ एलसीबीच्या पथकाला मोठी माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोई आणि बिन्नी गुज्जर गॅंगचा सक्रिय सदस्य यवतमाळात असल्याचे गोपनीय खबऱ्याकडून सांगण्यात आले. पोलिसांनी याची पडताळणी करून शहरातील जांब रोडवरील दांडेकर ले-आऊट येथून त्या सदस्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर राजस्थान पोलिसांनी २५ हजार रोख बक्षीस ठेवले होते. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.
भूपेंद्रसिंग ऊर्फ भिंडा जरनैलसिंग (वय ३५) रा. ग्राम अहारना खुर्द पोस्ट. मेहटियाना जि. होशियारपूर पंजाब असे अटक करण्यात आलेल्या गॅंगस्टरचे नाव आहे. त्याने २०२३ मध्ये राजस्थानातील बाडनेर येथे हरिपालसिंग ऊर्फ रिंकू (रा. गंगानगर) याचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो पसार असल्याने राजस्थान पोलिसांनी भूपेंद्रसिंग याच्यावर २५ हजारांचे रोख बक्षीस ठेवले होते.
भूपेंद्रसिंग हा लॉरेन्स बिष्णोई गॅंग, बिन्नी गुज्जर गॅंग यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करत होता. यासाठी त्याला दरमहा २५ हजार रुपये दिले जात होते. ही रक्कम त्याला बिन्नी गुज्जर याचा भाऊ तसेच गोल्डी ब्रार याच्याकडून अमेरिकेतून आर्थिक मदत मिळत होती. राजस्थान पोलिस मागावर असल्याने भूपेंद्रसिंग यवतमाळात आला. मागील दोन वर्षांपासून तो येथे ढाबा व्यावसायिक म्हणून वास्तव्य करीत होता.
एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, जमादार विनोद राठोड, नीलेश राठोड, आकाश सहारे, ममता देवतळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे भूपेंद्रसिंग याला अटक केली. पुढील कारवाई पाेलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

एकूण १७ गंभीर गुन्हे शिरावर

बिष्णोई व गुज्जर या गॅंगसाठी काम करणाऱ्या भूपेंद्रसिंग याने पैसे घेऊन अनेकांची हत्या केली आहे. त्याच्यावर तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. पंजाब राज्यात १६, तर राजस्थानमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. तेथे आपला एन्काऊंटर होईल या भीतीने भूपेंद्रसिंग यवतमाळात दडून बसला होता.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!