नागपूर सामाजिक

महाज्योती इमारतीच्या भूमिपूजनावरून सामाजिक संघटनांचा आक्षेप: धार्मिकऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याची मागणी

महाज्योती नागपूर आणि नागपूर सुधार प्रन्यास या संस्थांवर होती भूमिपूजनाची जबाबदारी

​नागपूर: प्रतिनिधी 

महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने स्थापन झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात वेदोक्त मंत्रोच्चार वापरल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात सामाजिक संघटनांनी राज्याचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शैक्षणिक व सामाजिक संस्था स्थापन करण्यामागे शासनाचा मुख्य उद्देश विद्यार्थी व नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद वृद्धिंगत करणे हा असतो. परंतु, महाज्योतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन वेदोक्त मंत्रोच्चाराने करण्यात आले, जे महात्मा फुले यांच्या अनिष्ट धार्मिक रूढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या विरोधातील जीवनकार्याला आणि संविधानातील ५१(एच) अनुच्छेदानुसार अपेक्षित असलेल्या विज्ञानवादी दृष्टिकोन, मानवतावाद, संशोधक वृत्ती व चिकित्सक बुद्धी च्या विकासाला तडा देणारे आहे.
​संघटनांच्या मते, राज्याला कोणताही धर्म नाही, ते धर्मनिरपेक्ष आहे आणि या तत्वाला सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दुजोरा दिला आहे. मंत्रीपदाची शपथ घेताना संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतल्यानंतर, एका विशिष्ट धर्माच्या पद्धतीनुसार भूमिपूजन करणे आणि या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री, मा. महसूल मंत्री तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी सहभागी होणे हा महात्मा जोतीराव फुले आणि भारतीय संविधानाचा अपमान आहे.
सर्व सामाजिक संघटनांची मुख्य मागणी आहे की, सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिचे उद्घाटन कोणत्याही धार्मिक पद्धतीने होऊ नये. जर या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास सर्व सामाजिक संघटना तीव्र स्वरूपात विरोध करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सामाजिक संघटनांनी आशा व्यक्त केली आहे की, यापुढे शासनाकडून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच सदर निवेदनाच्या प्रती चेअरमेन, नागपूर सुधार प्रन्यास; व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती नागपूर; आणि जिल्हाधिकारी, नागपूर यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदन देण्यासाठी, बहुजन संघर्ष समिती,ओबीसी युवा अधिकार मंच, मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषद, बाणाई नागपूर, सत्यशोधक समाज, कर्पूरी ठाकूर विचार मंच, शिक्षा बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपब्लिकन फेडरेशन,समता सैनिक दल, अनिस आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यामध्ये प्रामुख्याने नागेश चौधरी, उमेश कोर्राम, डॉ.संजय शेंडे, स्वाती रोडे,अनिता ठेंगरे, नंदा देशमुख ,दिलीप खोडके, प्रमोद वैद्य, प्रताप पटले ,अजय यावलकर, प्रा.जावेद शेख, , प्रदीप नगरारे, बाबा बिडकर, नागपुर,प्रदीप शेंडे, जया देशमुख, नब्बु शेख,महेंद्र गांजरे,नरेश खडसे,रमेश बिजेकर ,जगजीत सिंग, रामभाऊ डोंगरे, त्रिलोक हजारे,सुधांशू मोहोड, राम काळे, पियुष आकरे, शुभम तिखट, सुहास अंबादे, होमेश भुजाडे, किशोर खांडेकर, सुनील सारीपुत्त, सुशील मेश्राम, मिलिंद पखाले आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!