धामणगाव रेल्वे

धामणगावात ५७ गोवंश कातड्यांसह ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

दत्तापूर पोलिसांची मोठी कारवाई ; दोन आरोपींना अटक

धामणगाव रेल्वे 

दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गोवंशाच्या कातड्यांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दत्तापूर पोलिसांनी यवतमाळ रोडवरील नारगावंडी येथे नाकाबंदी करून ५७ गोवंशाच्या कातड्यांसह एक टाटा एस (छोटा हत्ती) वाहन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ३,३२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक मुख्य आरोपी सध्या फरार आहे.
गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी दत्तापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजाजन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दीपक पंधरे, सोनू भालेराव आणि पंचांसह यवतमाळ रोडवरील नारगावंडी येथे नाकाबंदी करण्यात आली होती. दत्तापूर येथील आठवडी बाजारातून एक टाटा एस वाहन क्रमांक एम एच ४८ ए जी ०३८१ गोवंशाची कातडी भरून वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

वाहनाची तपासणी आणि कातड्यांची जप्ती

नाकाबंदी दरम्यान संशयास्पद टाटा एस वाहन थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, वाहनात गोवंश सदृश्य जनावरांची कातडी आढळून आली. पोलिसांनी वाहनातील ५७ नग गोवंश कातडी (प्रत्येकी किंमत ५०० रुपये, एकूण किंमत २८,५०० रुपये) आणि वाहतुकीसाठी वापरलेले ३ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन, असा एकूण ३,३२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेली कातडी पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी वाहनातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे:

१. मोहम्मद सोहेल शेख मुश्ताक (वय २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. नेहरू नगर, बाभुळगाव, जि. यवतमाळ)
२. अब्दुल शमी अब्दुल रहीम (वय ६४ वर्षे, धंदा- मजुरी, रा. नेहरू नगर, बाभुळगाव, जि. यवतमाळ)
चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की, दत्तापूर येथील आठवडी बाजारात राहणारा मोहम्मद साबीर अब्दुल रऊफ हा जनावरांची कत्तल करून मांस विक्री करतो आणि गोवंशाची कातडी साठवून त्यांना विकायचा. हे दोघे ती कातडी इतर ठिकाणी विकण्यासाठी घेऊन जात होते. सध्या मोहम्मद साबीर अब्दुल रऊफ हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५, ५(ब), ५(क), ९(अ), ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!