अमरावती

अमरावतीत ‘शंभूशौर्य मर्दानी आखाड्या’ तर्फे ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अमरावती: प्रतिनिधी

“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” हा विचार मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केवळ विचारांवर नाही, तर सामर्थ्यावर केली. आजच्या धावपळीच्या आणि असुरक्षित काळात केवळ ‘शास्त्र’ (शिक्षण) असून चालणार नाही, तर हातामध्ये ‘शस्त्र’ चालवण्याचे कसब असणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने अमरावतीमध्ये ‘शंभूशौर्य मर्दानी आखाड्या’ च्या वतीने भव्य ‘मर्दानी खेळ व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

जिजाऊंचा वारसा आणि आजची गरज*

राजमाता जिजाऊंनी शिवरायांना बालपणीच नीतिशास्त्रासोबतच युद्धशास्त्राचे धडे दिले. “स्त्रीने केवळ सोसायचे नसते, तर अन्याय करणाऱ्याचा प्रतिकार करायचा असतो,” हा संस्कार त्यांनी रुजवला. आज समाजात घडणाऱ्या दुर्दैवी घटना पाहता, महिला आणि तरुणांनी स्वतःच्या रक्षणासाठी कोणावरही अवलंबून राहू नये, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

शास्त्र आणि शस्त्र: एक सुवर्णसंगम

समाजात बुद्धिवंत असणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच शारीरिकदृष्ट्या सक्षम असणेही आवश्यक आहे. शास्त्र आपल्याला जगण्याची पद्धत शिकवते, तर शस्त्र आपल्याला सन्मानाने जगण्याचे सामर्थ्य देते. सध्याच्या काळात स्वसंरक्षणाचे तंत्र अवगत असणे हे केवळ छंदासाठी नाही, तर सुरक्षिततेसाठी अनिवार्य झाले आहे.

शिबिराचे मुख्य आकर्षण:

या शिबिरात अनुभवी प्रशिक्षकांकडून लाठी काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, नियुद्ध तसेच शिवकालीन गुप्तहेर भाषा करपल्लवी या कलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरचे शिबीर १५ मे ते ३० मे २०२६ सकाळी ६:३० ते ८:३०, म.न.पा. शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर नगर, अमरावती येथे होणार असून यामध्ये १० वर्षांवरील सर्व वयोगटांसाठी हे शिबीर राहणार आहे.
आपल्या गौरवशाली परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी आणि स्वतःला सक्षम बनवण्यासाठी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गौरव केने, अनुराधा पांडे, जयेश वाढाई, भूषण खेडकर, रक्षित खाणीवाले, स्वराज ठाकरे, अथर्व पहाडे, अथर्व डबली, अंजली चाफेकर,महेश रहाटगावकर, पराग छांगनी,प्रयागराज लोमटे, अथर्व बुरंगे, प्रगती सुदा, सारिका यादव, जय पांडे, सुशांत बल्लाळ, रेणुका देशपांडे. यांनी केले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!