सुरज गंथडे यांच्या नेतृत्वात उद्या तहसील कार्यालयात ठिय्या
आमदाराच्या हस्ते उदघाटन जोरात, कामं मात्र अद्यापही कोमात!”
धामणगाव रेल्वे
आमदारांना बोलावून थाटामाटात उद्घाटन उरकायचे, पण प्रत्यक्षात शेतकरी शेतात कसा जाईल याचा विचारच करायचा नाही? प्रशासनाच्या याच ‘टोलवाटोलवी’ आणि निष्क्रिय कारभाराचे जाहीर धिंडवडे काढत प्रहार जनशक्ती पक्षाने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. अधिकृत पत्रानुसार, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार आणि कामचुकार कंपन्यांविरोधात प्रहारचे तालुकाध्यक्ष सूरज गंथडे यांनी आरपारची लढाई पुकारली असून उद्या, २ जून २०२६ रोजी तहसील कार्यालयावर धडक ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे!
२७५ रस्त्यांचे उद्घाटन फक्त कागदावर?
आमदार प्रताप दादा अडसड यांच्या हस्ते तालुक्यातील तब्बल २७५ ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्त्यांचे’ उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले होते. पण ग्राउंड झिरोवरील वास्तव धक्कादायक आहे! बोटावर मोजण्याइतके १०-१५ रस्ते सोडले, तर एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.
शेतकऱ्यांनी यापूर्वी १२ मे रोजी जेव्हा जाब विचारला, तेव्हा प्रशासनाने फक्त टोलवाटोलवी केली. संपूर्ण उन्हाळा निघून गेला, पण संबंधित विभागाला आवश्यक असणारी ‘सुप्रमा’ (सुधारित प्रशासकीय मान्यता) देण्यास तहसीलदारांनी हलगर्जीपणा केला. आता ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी चिखलातून वाट काढायची का?, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ करून फौजदारी गुन्हे दाखल करा!
प्रहार जनशक्ती पक्षाने पत्रात थेट मागणी केली आहे की, ज्या कंत्राटदार कंपन्यांनी कामे अर्धवट ठेवली किंवा सुरूच केली नाहीत, त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाका आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा!
थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
हे आंदोलन केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित राहिलेले नाही या तक्रारीची थेट प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. १ जून २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने हे पत्र अधिकृत शिक्का मारून स्वीकारले आहे.














Add Comment