अमरावती

प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेसच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचा आरोप; संस्थेचा खुलासा, दोषींवर कारवाईचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी

प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेस ही संस्था सन २००५ साली कायदेशीररीत्या नोंदविण्यात आली असून, सन २००५ पासून विविध प्रकारच्या कर्जवाटपाचा व्यवसाय करीत आहे. तसेच गृहकर्ज, शासकीय योजनांअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे वितरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवसाय करणाऱ्या संस्थेकडून सह-बँकेची अधिकृत एजन्सी म्हणून संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, संपूर्ण भारतात सोलर प्रकल्प, मोठे उद्योग, शेती उद्योग आदींसाठी विविध योजनांअंतर्गत अर्थपुरवठा करण्यासाठीही प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेस ही अधिकृत एजन्सी म्हणून कार्यरत आहे. संस्थेमध्ये विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया क्रमप्राप्त असतानाच, अमरावती येथील विजय भिमराव चडोकार यांनी स्वतःला प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेसचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून अनेक लोकांकडून प्रोसेस फीच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तक्रारीनुसार, विजय भिमराव चडोकार यांनी व्यवसायासाठी तातडीने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून यवतमाळ येथील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानाला भेट दिली. त्यावेळी स्वतःला प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेसचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगत, कर्ज मंजुरीसाठी लागणारा कायदेशीर खर्च म्हणून ₹२१,९०० रक्कम संबंधित व्यापाऱ्याकडून स्वीकारली.
मात्र, कायदेशीर खर्चाची रक्कम भरूनही कर्ज मंजूर न झाल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी अमरावती येथील प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेसच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी विजय भिमराव चडोकार यांचा संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे तसेच त्यांना संस्थेकडून कोणतेही पद देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विजय चडोकार यांनी पूर्वनियोजित कट रचून तोतयेगिरी करून फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर यवतमाळ येथील व्यापाऱ्यांनी संस्थेकडे या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत संस्थेचे तुषार विजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विजय भिमराव चडोकार हे संस्थेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत. तत्काळ कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी संस्थेकडे प्राप्त झाल्या आहेत. काही कर्ज अर्जदारांना कर्ज मंजूर झाल्याचे खोटे दस्तऐवज दाखवून त्यांच्याकडून कायदेशीर खर्चाच्या नावाखाली रक्कम घेतल्याच्या तक्रारीही संस्थेच्या कार्यालयात दाखल झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर संस्थेने स्पष्ट केले आहे की, सन 2005 पासून संस्था कायदेशीररीत्या वित्तीय व्यवसायात कार्यरत असून आजपर्यंत संस्थेत ‘पब्लिक रिलेशन ऑफिसर (PRO)’, ‘शाखा व्यवस्थापक (Branch Manager)’ किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही पदावर तात्पुरते कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या नावाने कोणीही स्वतःला अधिकारी, प्रतिनिधी किंवा कर्मचारी म्हणून सांगत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संस्थेने केले आहे. तसेच विजय भिमराव चडोकार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, विजय भिमराव चडोकार यांनी विविध कारणांनी अनेक नागरिकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी समोर येत असल्याची माहिती संस्थेला प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे तसेच फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सर्व तक्रारदार आणि फसवणूक झालेल्या व्यक्तींनी केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!