अमरावती

बडनेरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांविरुद्ध गैरवर्तन सिद्ध; डीपीसीएचा महत्त्वपूर्ण निर्णय

अमरावती प्रतिनिधी

बडनेरा पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिवाजी चव्हाण यांनी कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा व कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट करत विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण, अमरावतीने त्यांच्याविरुद्ध गैरवर्तन सिद्ध केले आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक संजय नागोराव देशमुख आणि पोलिस शिपाई धीरज ओमप्रकाश यादव यांच्याविरुद्धची तक्रार मात्र फेटाळण्यात आली.
गजानन नगर, न्यू टाऊन, बडनेरा येथील नरेंद्र नामदेवराव गजबिये यांनी महाराष्ट्र पोलिस (सुधारणा व सातत्य) अधिनियम, २०१४ च्या कलम २२-क्यू अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाने सुनावणी घेत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी निकाल दिला.
प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी कायद्याचे गंभीर उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ते कलम २२-क्यू (१)(अ)(viii) तसेच २०१८ च्या नियमांतील नियमन २(न) अंतर्गत गैरवर्तनास दोषी ठरतात, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
तसेच, पोलिस उपनिरीक्षक संजय देशमुख यांनी तक्रारदाराचा मौखिक जबाब वरिष्ठांच्या निर्देशानुसार नोंदवून त्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी स्वतःहून कोणतीही बेकायदेशीर कृती केल्याचे आढळून न आल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. पोलिस शिपाई धीरज यादव यांच्याविरुद्धही गैरवर्तनाचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांचीही तक्रार फेटाळण्यात आली.
प्राधिकरणाच्या अध्यक्ष उषा एस. ठाकरे यांनी हा निर्णय दिला. या निर्णयावर सदस्य पी. टी. पाटील आणि सदस्य पंकज निखार यांनीही स्वाक्षरी केली आहे.
प्राधिकरणाने निर्णयाची प्रत तक्रारदार व सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना विनामूल्य देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हा निर्णय सर्व वरिष्ठ पर्यवेक्षकीय पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आणि महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडे कलम २२-आर(१) अंतर्गत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. हा निर्णय विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!