धामणगाव रेल्वे

निंबोरा बोडखा येथे वादळी वाऱ्यामुळे घराची पडझड ; प्रशासनाकडून तात्काळ दखल !

१३ कुटुंबाचे मोठे नुकसान ; सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांची प्रत्यक्ष पाहणी

धामणगाव रेल्वे

तालुक्यात ७ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे निंबोरा बोडखा गावातील अनेक घरांचे व गुरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार गावातील १३ कुटुंबांचे नुकसान झाले असून त्यामध्ये १० घरे व ३ गुरांचे गोठे बाधित झाले आहेत. यापैकी दोन घरांचे अंशतः नुकसान झाले असून उर्वरित घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे निंबोरा बोडखे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून जीवनावश्यक वस्तूची नासाडी झाली असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.

  नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ८ जून सोमवार रोजी दुपारी सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त मालमत्तांचे जिओ-टॅग फोटो व आवश्यक माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात येणार असून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी योगेश वानखडे यांच्याकडून सांगण्यात आले.
सदरच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी करताना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी किशोरी पारेकर, प्रशासक सचिन बमनोटे, संगणक परिचालक श्रीकांत मते, गावातील कोतवाल तसेच ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश गेटमे उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!