धामणगाव रेल्वे शेती विषयक

धामणगावात नाफेडच्या चना हमीभाव खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची लूट ? नियमांची पायमल्ली !

प्रहारचे तालुका प्रमुख सुरज गंथडे आक्रमक

धामणगाव रेल्वे

नाफेड मार्फत हमीभाव खरेदी हंगाम २०२५-२६ अंतर्गत गुरु गजानन ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या वतीने धामणगाव येथील खत्री जिनींग अँड टेक्स्टाईल इंडस्ट्रीज येथे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तीन दिवसाअगोदर हमीभाव खरेदी केंद्राचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. हमीभाव खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून, मध्यस्थांची साखळी कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी केले होते. मात्र या उलटची परिस्थिती खत्री जिनिंग मध्ये आज दि. २२ मार्च रोजी सकाळपासूनच सुरु असलेल्या गोंधळामध्ये पाहायला मिळाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लूट कंपनी सह संचालक मंडळाकडून केली जात असून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांसह प्रहारचे तालुका प्रमुख सुरज गंथडे यांनी केला आहे. दरम्यान सकाळी ७ : ३० वाजतापासूनच मोठा गोंधळ याठिकाणी पाहायला मिळाला आहे.

सविस्तर असे कि, शेतकरी रंजित थाडे हे आपला चना विक्री करिता आज सकाळी ७:३० वाजता खत्री जिनिंग येथे आले असता खरेदी केंद्र सुरू व्हायच्या अगोदरच व्यापाऱ्यांचा ६०० पोते चना विना चाळणी मारून नाफेडच्या कट्ट्यात विक्री साठी भरण्यात आले होते. जेव्हा कि, शेतकऱ्याचा चना चाळणी मारून आणि व्यापाऱ्यांचा चना हा तसाच विक्री करण्यात येत असल्याचे धक्कादायक माहिती निदर्शनास आली. त्यामुळे सदरची माहिती हि शेतकरी यांनी सुरज गंथडे यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शासनाकडून नाफेडमार्फत चना खरेदी सुरु असताना शासनाचा एकही अधिकारी येथे उपस्थित नाही, कुठलाही संचालक मंडळाचा सदस्य उपस्थित नसताना विना चाळणी मारता ६०० पोते चना नाफेड च्या पोत्यात कसा भरण्यात आला. असेच इतर ठिकाणी २० रुपये पोते प्रमाणे हमाली असताना येथे ४० रुपये कसे घेतल्या जाते असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती याठिकाणी शेतकरीसह सुरज गंथडे यांनी संचालक मंडळातील सदस्यावर केली. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ पर्यंत चना खरेदिकेंद्रावरील कामकाज ठप्प होते.
दरम्यान काही वेळातच  राजकीय पुढारी व इतर संचालक मंडळातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही लोकांकडून विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र वेळीच पोलिसांना पाचारण करण्यात आले असता ठाणेदार गिरीश ताथोड यांनी स्वतः उपस्थित राहुल परिस्थिती हाताळली त्यामुळे कुठलाही वाद झाला नाही.

घटनास्थळी ठाणेदार गिरीश ताथोड यांची उपस्थिती 

सदरच्या खत्री जिनिंग मध्ये गुरु गजानन ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. यांच्याकडून नाफेड अंतर्गत खरेदी करताना शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत असल्याने संबंधित नाफेड च्या अधिकाऱ्यांवर तसेच कंपनी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच कंपनी चे लायसन रद्द करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असे मत शेतकरी तसेच प्रहारचे तालुका प्रमुख सुरज गंथडे यांनी दिले….
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!