धामणगाव रेल्वे शासकीय

नागरिकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा लाभ घ्यावा – तहसिलदार अभय घोरपडे

७ मार्च ते १५ मे दरम्यान शिबिराचे आयोजन ; विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी

धामणगाव रेल्वे 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार धामणगाव रेल्वे तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर एक दिवसीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांच्या विविध तक्रारी व प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाचा कालावधी ७ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ असा असून शिबिरांच्या पूर्वतयारीसाठी ६ मार्च ते ६ मे दरम्यान विशेष तयारी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना महसूल विभागासह इतर विभागांच्या विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महसूल विभागामार्फत प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, सातबारा उतारा, रहिवासी दाखला, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, नाव दुरुस्ती, डिजिटल ७/१२ संदर्भात मार्गदर्शन तसेच ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच पीक पाहणी, ‘माझा ७/१२’ पोर्टलवरील सेवा आणि विविध महसूल विषयक कामांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. याशिवाय पंचायत समितीमार्फत घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत विभाग तसेच आयसीडीएस अंतर्गत विविध योजनांची माहिती दिली जाईल. कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवरील योजना, शेतकरी गट नोंदणी, फलोत्पादन लागवड अर्ज स्वीकृती तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाणंद रस्ते योजनेची माहिती, तर भूमी अभिलेख विभागाकडून सनद धारण व ऑनलाइन डेटा एकत्रीकरणासंदर्भातील सेवा देण्यात येणार आहेत. तालुका आरोग्य विभागाकडून गोल्ड कार्ड व आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे.
प्रत्येक मंडळासाठी नोडल अधिकारी व संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे तहसीलदार अभय घोरपडे यांनी केले आहे.

महसूल मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

७ मार्च – चिंचोली (ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली)
९ मार्च – भातकुली (ग्रामपंचायत कार्यालय भातकुली)
८ एप्रिल – तळेगाव दशासर (ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव दशासर)
१० एप्रिल – अंजनसिंगी (ग्रामपंचायत कार्यालय अंजनसिंगी)
१७ एप्रिल – मंगरुळ दस्तगीर (ग्रामपंचायत कार्यालय मंगरुळ दस्तगीर)
८ मे – दत्तापूर (तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथील सभागृह)
१५ मे – जुना धामणगाव (नगर परिषद धामणगाव रेल्वे येथील सभागृह)

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!