अमरावती विभागाच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग
अमरावती, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेली २०२६ ची राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत पूर्व जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अमरावती विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्षा उषा ठाकरे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक तथा सदस्य पी. टी. पाटील आणि नागरी समाजाचे प्रख्यात प्रतिनिधी तथा सदस्य पंकज निखार यांनी अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले.
कार्यशाळेत पोलीस तक्रार निवारण व्यवस्थेतील पारदर्शकता, नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण, प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीतील सुधारणा, विविध कायदेशीर तरतुदी तसेच पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या कामकाजातील सर्वोत्तम पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यभरातील प्रतिनिधींनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करून आगामी कुंभमेळ्याविषयीचे माहितीपुस्तक भेट दिले.

पूर्व जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा उषा ठाकरे म्हणाल्या, “नागरिकांचा पोलीस तक्रार प्राधिकरणावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात.”

सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक तथा सदस्य पी. टी. पाटील म्हणाले, “पोलीस तक्रारींचे निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत निवारण करण्यासाठी सर्व प्राधिकरणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक आहे.”

नागरी समाजाचे प्रख्यात प्रतिनिधी तथा सदस्य पंकज निखार म्हणाले, “राज्यभरातील प्रतिनिधींशी झालेली चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण भविष्यातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.”














Add Comment