नवी वस्तीतील जागेची पाहणी करण्यात येणार ; संयुक्त पत्रकार संघाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
अमरावती प्रतिनिधी – अविनाश गोंडाणे
बडनेरा शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज ‘पत्रकार भवन’ उभारण्याच्या मागणीला आता ठोस दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त पत्रकार संघ, बडनेरा यांच्या वतीने आमदार रवि राणा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार भवनासाठी नवी वस्ती, बडनेरा येथे जागेची पाहणी करण्याचे तसेच भवनाच्या उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार रवि राणा यांनी केली.
बडनेरा शहर हे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाचे शहर असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच लोकहिताच्या विविध प्रश्नांना प्रसारमाध्यमांतून सातत्याने वाचा फोडली जाते. मात्र, शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक, पत्रकार परिषद, प्रशिक्षण, चर्चासत्रे आणि संदर्भ साहित्याच्या सुविधांसह कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन संयुक्त पत्रकार संघ, बडनेरा यांच्या वतीने आमदार रवि राणा यांच्याकडे नवी वस्ती येथे पत्रकार भवनासाठी शासकीय अथवा महापालिकेची योग्य जागा उपलब्ध करून देण्याची तसेच आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात पत्रकार भवनामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व सभागृह, पत्रकार परिषदांसाठी सुसज्ज व्यवस्था, वाचनालय व संदर्भ साहित्य केंद्र, डिजिटल मीडिया व संगणक सुविधा, नवोदित पत्रकारांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, सामाजिक व लोकहिताच्या विषयांवर चर्चासत्रांसाठी सुविधा तसेच महिला पत्रकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार भवन केवळ पत्रकारांसाठीची वास्तू नसून, नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी लोकशाही संवादाचे केंद्र ठरावे, अशी भूमिका संयुक्त पत्रकार संघाने निवेदनातून मांडली.
निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार रवि राणा यांनी पत्रकार भवनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नवी वस्ती परिसरातील जागेची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या पत्रकार भवनाच्या मागणीला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी संयुक्त पत्रकार संघ, बडनेरा यांचे पदाधिकारी अध्यक्ष सिद्धार्थ बनसोड, उपाध्यक्ष मो.शोएबउद्दीन, सचिव मंगेश चौहान, सहसचिव अविनाश गोंडाणे, कोषाध्यक्ष मुख्तार अहमद, सदस्य मछिंद्र भटकर, सादिक शाह, संजय पंड्या, मो.एहतेशाम सरवर, अ.शफिक शेख, सतिश भालेराव व सदस्य उपस्थित होते. पत्रकार भवनासाठी जागा निश्चिती, प्रशासकीय प्रक्रिया, निधी उपलब्धता आणि बांधकामाच्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा पत्रकार संघाने व्यक्त केली.
बडनेऱ्याच्या पत्रकारिता क्षेत्राला स्वतंत्र ओळख देणाऱ्या पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी आता पुढील प्रशासकीय पावले किती वेगाने उचलली जातात, याकडे पत्रकारांसह बडनेरावासीयांचे लक्ष लागले आहे.
Add Comment