वर्धा-

वर्ध्याच्या ‘गोरस भंडार’ वर छापा, २५.८६ लाखांचा साठा जप्त

तुकाराम मुंढे ऍक्शन ; आस्थापना तात्काळ सील..

वर्धा : प्रतिनिधी 

गोरसपाक हा देशभर प्रसिद्ध खाद्यपदार्थ तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थसाठी ग्राहकांच्या उड्या गोरस भंडार या संस्थेवर पडत असतात. मात्र आज ही संस्था चांगलीच गोत्यात आली आहे. अन्न व औषधी प्रशासनाने आज केलेली कारवाई या संस्थेच्या विश्वसवार प्रश्नाचिन्ह निर्माण करून गेली आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या प्रवृत्तींवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. वर्धा येथील मगनवाडी परिसरातील नामांकित संस्था असलेल्या मे. वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था (गोरस भंडार) या आस्थापनेवर प्रशासनाच्या संयुक्त पथकाने आज, ३१ मे रोजी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत तब्बल २५ लाख ८६ हजार १६८ रुपयांचा संशयास्पद व असुरक्षित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, सदर आस्थापना तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अस्वच्छ वातावरणात उत्पादन

अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाला मिळालेल्या एका गोपनीय आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई आखण्यात आली होती. प्रशासनाचे नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी राऊत व राहुल खंडागळे, तसेच वर्ध्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांच्या संयुक्त पथकाने मगनवाडी, वर्धा येथील ‘गोरस भंडार’च्या उत्पादन केंद्राला अचानक भेट देऊन कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान सदर ठिकाणी अत्यंत असुरक्षित, अस्वच्छ आणि अन्न कायद्याच्या निकषांना हरताळ फासणाऱ्या वातावरणात अन्नपदार्थांचे उत्पादन होत असल्याचे पथकाला रंगेहात आढळून आले. कारवाईच्या वेळी तिथे गाईचे दूध, तूप, ताक (बटर मिल्क) आणि खवा हे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी व साठवणुकीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. या साठ्याबाबत पथकाला तीव्र संशय आल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी तातडीने चारही अन्नपदार्थांचे कायदेशीर नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले.

शासकीय प्रयोगशाळेत नमुने पाठविले

हे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या आस्थापनाविरुद्ध पुढील न्यायालयीन व फौजदारी कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापूर्वीही ५० हजारांचा दंड या संस्थेस करण्यात आला आहे.
विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, या दुग्ध उत्पादक संस्थेची ही पहिलीच अनियमितेची वेळ नाही. यापूर्वीही ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करत कमी दर्जाच्या व निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री केल्याबद्दल या पेढीला प्रशासनाकडून ५०,०००/- (पन्नास हजार) रुपयांचा जबर दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, या कारवाईनंतरही व्यवस्थापनाने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केली नाही. परिणामी, आज पुन्हा एकदा अत्यंत असुरक्षित वातावरणात बेकायदेशीरपणे उत्पादन सुरू असल्याचे आढळल्याने, अन्न सुरक्षा परवाने व नोंदणी नियमन २०११ मधील नियमन २.१.१४ चा आधार घेत प्रशासनाने सदर आस्थापना पूर्णपणे बंद करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच,

बाजारातील पदार्थ परत घेतले

उत्पादन करून बाजारात वितरित केले गेलेले सर्व अन्नपदार्थ तात्काळ ग्राहकांकडून व बाजारातून ‘रिकॉल’ (परत गोळा) करण्याचे आदेश पेढीला देण्यात आले आहेत. सदर धडक आणि यशस्वी कारवाई अन्न व औषध प्रशासन वर्धा विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले आणि नागपूर विभागाचे सह आयुक्त कृष्णा जयपुरकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ईशारा

या मोठ्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले की जनतेच्या आरोग्याशी होणारा कोणताही खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यात कोणीही पैशांच्या हव्यासापोटी भेसळ केल्यास अथवा प्रतिबंधित आणि असुरक्षित अन्नपदार्थांची साठवणूक वा विक्री केल्यास, त्यांच्याविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर आणि कडक कारवाई केली जाईल.नागरिकांनी जागरूक राहून तक्रार करण्याचे आवाहन आहे.

जनतेलाही सतर्क राहण्याचे आवाहन

अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेलाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बाजारातील कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत शंका आल्यास नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावून तक्रार नोंदवावी. तक्रार करताना त्यात स्वतःचे नाव, अचूक पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच संबंधित संशयास्पद आस्थापनेचा पूर्ण पत्ता आणि कोणत्या अन्नाबाबत तक्रार आहे, याची सविस्तर माहिती नमूद करावी, जेणेकरून तत्परतेने कारवाई करणे शक्य होईल. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही देखील सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, वर्धा यांनी दिली आहे. या कारवाईमुळे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!