शैक्षणिक हटके

पठ्ठ्याने एकाच वर्षात ७ नोकऱ्यावर लावली मोहोर

सातारा – जनसूर्या मीडिया

कर्तृत्‍व सिद्ध करायचं असेल, तर स्‍वप्‍नही तसेच पाहावे लागते आणि त्‍या स्वप्नपूर्तीसाठी मग जिद्दीला चिकाटीची जोड देत वाट चालल्‍यास कर्तृत्‍वही सिद्ध होते अन्‌ स्वप्नपूर्तीचा आनंदही निश्‍चितच मिळतो. याचा प्रत्‍यय भंडारमाची (ता. कोरेगाव) या छोट्याशा खेड्यातील मंगेश मोहन माकरने एकाच वर्षात तब्‍बल सात शासकीय पदांना गवसणी घालून दिला आहे.
आजकाल शासकीय नोकरी मिळणे म्‍हणजे एक दिवास्वप्‍न असे बोलले जात असले, तरी प्रयत्‍न करणारांना ते देखील अशक्‍य नाही, हेच मंगेशच्‍या धडपडीतून सिद्ध होते आणि त्‍याची ही किमया इतरांसाठीही प्रेरणादायीच आहे. अल्‍पशिक्षित आई-वडील आपल्‍या शिक्षणासाठी करीत असलेले काबाडकष्‍ट त्‍याच्‍या नजरेत कायम होते. त्‍यामुळे तो देखील शिक्षणाबरोबरच अर्धवेळ काम करून आपल्‍या स्वप्नपूर्तीसाठी, आई-वडिलांच्‍या कष्‍टाची जाणीव ठेवत एकेक पाऊल पुढे टाकत शासनाच्या सरळ सेवा परीक्षेची तयारी करीत होता.
भंडारमाचीसारख्‍या ग्रामीण भागात जडणघडण आणि जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाल्‍यावर तो माध्यमिक शिक्षणासाठी अंगापूरला मावशीकडे आला. तेथून साताऱ्याच्या एलबीएस महाविद्यालयातून त्‍याने पदवीचे शिक्षण घेतले. ते करीत असतानाच एका हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ काम करत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्‍या अभ्‍यासिकेत सातत्यपूर्ण अभ्‍यास केला. हा अभ्‍यास करत असताना योग्‍य संगत, परिस्‍थितीची जाणीव आणि स्वप्नपूर्तीसाठी धडपड करण्‍याची तयारी अशाप्रकारे चाकोरीबद्ध व्‍यक्तिमत्त्‍व घडवत त्‍याने सातत्‍याने विविध प्रकारच्‍या शासकीय परीक्षा देण्‍यास सुरुवात केली. यामध्‍ये त्‍याला अपयश देखील आले;‌ पण जिद्द न सोडता तो अभ्यास करत राहिला.
जानेवारी २०२४ मध्ये प्रथम मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत, फेब्रुवारीत जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी परिचर, मार्चमध्ये नगररचना विभाग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहाय्यक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची स्टेनो, राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाच्या परीक्षेतही यश मिळविले. त्यानंतर साताऱ्याच्या जलसंपदा विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन रुजू झाला.
योग्‍य मार्गाने चाललेल्‍या मंगेशला कुटुंबीयांचा पाठिंबा तर लाभलाच; परंतु त्‍याने आपल्‍या ध्‍येयाप्रती स्‍वत:शीच बांधलेली खूणगाठ कायम ठेवून हे यश मिळविल्‍याबद्दल त्‍याचे सर्व स्‍तरातून कौतुकही होत आहे.

एकाच वर्षात मिळवलेली पदे

सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय…………….जानेवारी २०२४

जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभाग…………………फेब्रुवारी

नगररचना विभाग सिंधुदुर्ग……………………….मार्च

जिल्हा परिषद रत्नागिरी…………………………मार्च

सोलापूर महापालिका…………………………..जून

राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर………………ऑगस्ट

जलसंपदा विभाग सातारा……………………….डिसेंबर

माझ्या मुलाने खूप कष्टाने यश मिळविले आहे. कोणती परीक्षा पास झाला, हे माहिती नाही; पण तो त्‍याने केलेल्‍या प्रयत्‍नांमध्‍ये यशस्‍वी झाला, याचा मोठा आनंद आहे. त्याच्या या यशात अनेकांनी साथ दिली आहे. शेवटी कोणत्‍याही आई-वडिलांना आपली मुलं मोठी होत असल्‍याचा अभिमानच असतो आणि तशी अभिमानास्‍पद कामगिरी मंगेश यापुढेही करीत राहील, हेच आमचे आशीर्वाद.
– मोहन माकर, भंडारमाची (ता. कोरेगाव)
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!