जनता दरबाराची माहिती जनतेपर्यंत कशा पद्धतीने पाहोचवली चा विचारला जाब
धामणगाव रेल्वे
येथील पंचायत समिती मध्ये ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार कार्यक्रम पार पडला होता. मात्र जनता दरबाराची माहिती जनतेलाच नसल्याची बातमी सर्वप्रथम जनसूर्या न्यूज ने “जनता दरबार जनतेसाठी कि, अधिकाऱ्यांसाठी” या मथळ्याखाली प्रकाशित केली होती. त्यामुळे पंचायत समितीमधील सावळागोंधळ उघडकीस आला होता. पंचायत समितीच्या कारभारावर नागरिकांसह ग्रा. प. पदाधिकाऱ्यांनी सुद्धा टीका केली होती.
जनता दरबार प्रकरणात “प्रहार” पक्षाची उडी
तालुक्यातील पंचायत समिती मधील जनता दरबार चांगलाच चर्चेत असून त्यात आता प्रहार पक्षाने सुद्धा उडी घेत प्रहार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरज गंथडे यांनी जनता दरबाराची माहिती जनतेपर्यंत कशी पोहचवली याची लेखी माहिती गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागितली आहे. जनता दरबार या कार्यक्रमाचा उद्देश तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत याची माहितीच न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याकरिता प्रहार पक्षाकडून गटविकास अधिकारी यांना सदरच्या कार्यक्रमाबत नागरिकांना कशा पद्धतीने अवगत करण्यात आले याची माहिती लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे प्रहार चे तालुका अध्यक्ष सुरज गंथडे यांनी सांगितले.
जनता दरबार हा उपक्रम नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र माहितीअभावी नागरिकांना सहभाग घेता आला नाही, तर अशा उपक्रमांची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे भविष्यात अशा कार्यक्रमांची माहिती गावागावांतून, सोशल मीडियाद्वारे, जाहीर सूचना, पत्रके व स्थानिक माध्यमांच्या सहाय्याने व्यापक पातळीवर पोहोचविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात येईल का हे पाहणे तेवढेच औत्सुकांचे ठरणार आहे.













Add Comment