धामणगाव रेल्वे सामाजिक

महामानवाला मानवंदना देण्यासाठी धामणगावात उसळला निळा जनसागर

विविध सामाजिक कार्यक्रमासह भव्य दिव्य महारॅलीचे आयोजन

धामणगाव रेल्वे

 

ज्यांच्या लेखनावर संपूर्ण भारत देश चालतो, ज्यांची जयंती भारतातच नव्हे तर तब्बल जगातील १५२ देशात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. अशा या विश्वरत्न, विश्वभुषण, क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या हर्षमय आणि निळमय वातावरणात धामणगावात शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. धामणगाव शहरातील नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून मानवंदना देण्यासाठी सकाळपासून बौद्ध अनुयायांनी व इतर समाजबांधवांची गर्दी दिसून आली.

 

शहराच्या विविध भागांतील गावागावात सामाजिक कार्यक्रमात भीमजयंतीचा उत्साह पहावयास मिळाला. तर ठिकठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी शिस्तबद्ध वातावरणात नगरपरिषद परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली. धामणगाव शहरातील वॉर्ड नंबर ४, आंबेडकर नगर, आठवडी बाजार, रेल्वे कॉर्टर, पुष्करणा नगर, पृथ्वीराज नगर, साईनगर, या विविध ठिकाणावरून येणाऱ्या असंख्य बौद्ध बांधवांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. दरम्यान एकत्रितपणे मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय हा शहरातील मुख्य रस्त्यांवर आल्याने सगळीकडे बुद्धमय आणि निळमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करून घोषणा व विविध भागातून आलेल्या रॅलीतील भीमगीतांनी शहर दुमदुमले होते.. बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या ढोल-ताशांच्या गजरात भीमगीतांच्या तालावर काढलेल्या सर्वच मिरवणुका मध्ये अगदी लहानापासून तर वृद्धांपर्यंत मंत्रमुग्ध झालेला जनसमुदाय पाहायला मिळाला. शहरातून विविध ठिकाणाहुन शांततेत आणि नियमांचे पालन करून काढण्यात आलेल्या रॅली नगर परिषदेतील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ एकत्रित येत महामानवाला मानवंदना देण्यात आली. यावेळी संपूर्ण दिवसभर ठिकठिकाणी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त देण्यात आला होता.

 

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!