धामणगाव रेल्वे

सरपंचाच्या हेकेखोरपणामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात; जळगांव आर्वी येथील प्रकार

पैशाअभावी रामगाव येथील कर्मचाऱ्याच्या मुलीचे दिवाळीच्या दिवशीच ग्रामीण रुग्णालयात निधन 

धामणगाव रेल्वे 
 नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणारी ग्रामपंचायत जळगाव आर्वी येथील कर्मचाऱ्याचे दिवाळीपूर्वी पगार न झाल्याने त्यांची दिवाळी अंधारात होत असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तर सचिवाने पगाराचे चेक दिले असतानादेखील सरपंचानी जाणीवपूर्वक सह्या न केल्यामुळे आमच्यावर अन्याय केल्याने दिवाळी सारखा सण अंधारात साजरा करण्याची वेळ आमच्यावर आलेली असल्याचे मत कर्मचारी यांनी मांडले. वर्षभर गावातील अनेक कामात आम्ही योगदान देतो. गावातील अनेक समस्या सरपंच पर्यंत न पोहचविता स्वतः च दूर करतो. परंतु सचिव साहेबांनी कर्मचारी यांचे पगाराचे चेक सह्या करून सरपंच सत्यभामा पंडित कांबळे यांच्या घरी पाठवले परंतु चेकवर सह्या आज करतो उद्या करतो असे उडवा उडविचे उत्तर देऊन अखेर आज दिवाळीच्या दिवसापर्यंत सुद्धा कर्मचारी यांच्या पगाराचे चेक कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही. तर सचिवाने मला विश्वासात न घेता चेक तयार केले असल्याचे म्हणणे सरपंचांनी बोलून दाखविले असल्याचे कर्मचारी सुधीर बुरघाटे यांनी सांगितले. मात्र सचिव सरपंच यांच्या भांडणात कर्मचाऱ्याचे दिवाळे निघाले हे मात्र तेवढेच खरे..

पैशाअभावी कर्मचाऱ्याच्या मुलीचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू

 रामगाव येथील कर्मचारी छगन पखाले हे अपंग असून ते पाणी सोडण्याचे काम करतात त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नसून फक्त ग्रामपंचायत मधून मिळणाऱ्या मानधनावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यात अनेक महिण्यापासून त्यांच्या मुलींची तब्बेत ठीक नव्हती दिवाळीच्या दिवशीच सकाळी मुलीची तब्बेत अचानक बिघडली मात्र हाती अतिरिक्त पैसा नसल्याने नाईलाजाने धामणगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र दुर्दैवाने लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच सकाळी १० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. कदाचित वेळेवर पगार झाला असता तर मुलीला योग्य उपचार मिळाला असता. मात्र सरपंचाने चेकवर सह्या न केल्याने पगार रखडले. त्यामुळे मुलीला जीव गमवावा लागला या मृत्यूला सुद्धा सरपंच जबाबदार असल्याचे रामगांव येथिल नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.
सामान्य फंडात पैसा नसेल तर समजू शकतो. मात्र पैसा उपलब्ध असून सचिवाने चेकवर सही केली असताना देखील सरपंचाने चेकवर सही कोणत्या कारणाने केली नसावी हे अद्यापही अनुत्तीर्ण आहे. कर्मचारी १२ महिने काम करतात परंतु दिवाळीत पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तसेच पैशाअभावी घडलेली दुर्दैवी घटना लक्षात घेता संपूर्ण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले होते. मात्र आपल्यामुळे सामान्य नागरिकांची दिवाळी अंधारात जायला नको करिता त्यांनी दिवाळी होई पर्यंत काम बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे गावकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. तर गुरुवार पासून संपूर्ण थकित वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करणार असल्याचे ग्रा. प. कर्मचारी यांनी सांगितले.. या संदर्भात सरपंच यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही…

दिवाळी पूर्वीच कर्मचाऱ्यांचे पगार व्हावे म्हणून त्यांना मी सही करून चेक दिले. परंतु अद्यापही सरपंचांनी चेकवर सही न केल्यामुळे कर्मचारी यांचे पगार होऊ शकले नाही – गजानन काळमेघ, ग्रा. प. सचिव, जळगाव आर्वी 

 

ग्रा. प. खात्यात पैसे उपलब्ध असून सचिवाने चेक दिले असताना देखील सरपंचांनी जाणीवपूर्वक सही केली नसल्याने आमच्या कुटुंबाला दिवाळी सारखा सण अंधारात करावा लागला. हा आमच्या कर्मचाऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय असून, आता जो पर्यंत पूर्ण थकित वेतन मिळणार नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन करणार – सुधीर बुरघाटे ग्रा. प. कर्मचारी, जळगाव आर्वी

 

माझ्या मुलीची प्रकृती अनेक महिन्यापासून ठीक राहत नव्हती, तसेच दिवाळी सारखा सण असून पगार न झाल्याने मुलगी अस्वस्थ होती त्यामुळे अचानक तिची प्रकृती बिघडल्याने पैशाअभावी तिला ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. चेक वर सही न केल्याने सरपंचांनी मुलीच्या अंतिमविधीसाठी मात्र १० हजार रुपये हाती ठेवले – छगन पखाले, कर्मचारी ग्रा. प. जळगाव आर्वी

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!