प्रतीक्षा पोकळे हिची संघर्षगाथा ‘सावली होईन सुखाची’
धामणगाव प्रतिनिधी
“ज्यांचं आयुष्य छोट्या गावात सुरू झालं, त्यांनाही मोठं स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे!” — हे शब्द फक्त भाषणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात उतरवणारी कहाणी म्हणजे प्रतीक्षा पोकळे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातून आलेली ही मुलगी आज संपूर्ण महाराष्ट्राला टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेरणा देत आहे. सध्या सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावली होईन सुखाची’ या गाजत असलेल्या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारत असलेली प्रतीक्षा ही केवळ एक कलाकार नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सुप्त स्वप्नांची आणि जिद्दीची प्रतिनिधी ठरली आहे.
‘बिट्टी’ ते ‘राधा’ – नायिकेचा प्रवास
या मालिकेतील प्रमुख पात्र म्हणजे बिट्टी उर्फ राधा. मालिकेच्या पहिल्या पर्वात राधा या पात्राचे बालपण दाखवले गेले होते. आता ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात प्रौढ राधाची भूमिका प्रतीक्षा पोकळे साकारत आहे. तिच्या सशक्त अभिनयामुळे या पात्राला नवीन उंची मिळाली आहे आणि प्रेक्षकांनीही या परिवर्तनाचा मनापासून स्वीकार केला आहे.
कुंपण ओलांडून पडद्यावरचा प्रवास
प्रतीक्षाने आपले शिक्षण मुंबई विद्यापीठाच्या थिएटर आर्ट्स अकॅडमीतून पूर्ण करताना अभिनयाची शास्त्रशुद्ध तालीम घेतली. अभिनय क्षेत्रात सुरुवात करताना तिने ‘क्राईम पेट्रोल’सारख्या मालिकांमध्ये काम करत कॅमेरासमोरील अनुभव घेतला. त्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत तिने पावनी नावाने साकारलेल्या निगेटिव्ह भूमिकेने तिला प्रेक्षकांची ओळख मिळवून दिली. सन २०२४ मध्ये ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत राधाच्या भूमिकेसाठी प्रमुख संधी मिळाल्यामुळे तिला मोठी झेप घेता आली. ही भूमिका तिच्या संघर्षाच्या काळात मिळालेली पहिली मोठी संधी ठरली.
शिस्त, संस्कार आणि संघर्ष — घरातून मिळालेला वारसा
प्रतीक्षाच्या अभिनयातील आत्मविश्वास, शिस्त आणि निष्ठा यामागे तिच्या घरातील पोलीस संस्कारांचे मोलाचे योगदान आहे. तिचे वडील महादेव पोकळे आणि आई शीला पोकळे — हे दोघेही सध्या अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावत आहेत. समाजासाठी अविरत झटणाऱ्या या पोलीस दाम्पत्याची कन्या अभिनय क्षेत्रात नावारूपाला येते आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. “आई-वडिलांनी कधीच माझ्या स्वप्नांना मर्यादा घातल्या नाहीत. उलट त्यांनी शिकवलं की — ‘शिस्तीत उभं राहूनच मोठं होता येतं,’” असं प्रतीक्षा नेहमीच सांगते.














Add Comment