धामणगाव रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्यरक्षक संभाजी महाराज जयंती सोहळा संपन्न

धामणगाव रेल्वे

युवकांसमोर सध्या आव्हानांचा डोंगर आहे. या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर महामानवांचे चरित्र, त्यांचा इतिहास आत्मसात करणे आवश्यक आहे. महापुरुषांचे चरित्र आत्मसात केल्यास त्यातून आव्हानांना पेलण्याची प्रेरणा मिळू शकते, असे प्रतिपादन वर्धा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रफुल क्षीरसागर यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने धामणगाव रेल्वे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मराठा सेवा संघ प्रणित संभाजी बिग्रेड च्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रमाता जिजाऊ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.विलास जाधव होते. प्रमुख पाहूणे म्हणून संभाजी ब्रिगेड चे जिल्हाउपाध्यक्ष गजानन मानकर, तालुकाध्यक्ष सुयोग ठाकरे , विद्यार्थी आघाडी चे अध्यक्ष मानस बोरघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

प्रफुल क्षीरसागर म्हणाले, युवकांसमोर सध्या मोठ्या प्रमाणात आव्हाने उभी ठाकली आहे. अशा स्थितीत विचारांचा जागर होणे महत्त्वाचे आहे. संभाजी महाराजांचा तेजस्वी आणि ओजस्वी खरा इतिहास आपल्या पासून लपवुन ठेवून खोटा इतिहास नजरेत आणून देण्यात आला. स्वराज्याचे धाकले धनी, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, शुरवीर योद्धा, अनेक ग्रंथसंपदा लिहिणारा, खरा साहित्यिक, एकही लढाई न हरणारा, संस्कृत विद्वान म्हणजे छञपती संभाजी महाराज होते. त्यामुळे आजच्या युवकांनी ‘युथ आयकॉन’ संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महामानवांना मानने आवश्यक आहे. आव्हानांना पेलण्याची ताकद निर्माण झाल्यास उद्याचा सशक्त भारत घडणार आहे. त्यामुळे या महामानवांना आपण आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. विलास जाधव म्हणाले, जयंत्या साजऱ्या करताना आपण देहभान विसरून त्यांना डोक्यावर घेतो. परंतु महामानवांना नुसतेच डोक्यावर घेऊन नाही तर त्यांच्या विचारांना आपल्या डोक्यात घेऊन आत्मसात करणे गरजेचे आहे. महामानवांना अपेक्षित मार्गावर आपण चालणार नसू तर त्यांचे वारस म्हणवून घेण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन परी राऊत आणि मृणाल घुगे यांनी केले. कार्यक्रमात गुरुदेव संस्कार शिबिरातील विद्यार्थी शिवराज भेंडे , विराज इंगळे, आराध्य राऊत यांनी लाठी काठी चे प्रात्यक्षिक सादर केले. याप्रसंगी रवी चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील वर्टेक्स कोचिंग क्लासेस चे संचालक शहाकर आणि ठाकरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला . तसेच हिरपूर येथील तरुण चेतन सोनटक्के याचे महाराष्ट्र पोलिस मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुजल बढिय यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गजानन भेंडे, गोपाल पेदाम, अनिकेत लहबर, हिमांशू शेंडे, अभिषेक सावलकर, हनुमंत ठाकरे, सत्यम राऊत इत्यादींनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!