संपूर्ण दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी कपिल पडघान यांची सीईओ कडे तक्रार
धामणगाव रेल्वे
अंजनसिंगी ग्रामपंचायत (वार्ड क्र. ४ – दलित वस्ती) येथे झालेले रस्ता काम भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता माहापात्रा यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या रु. ४ लाखांच्या रस्ता कामात निकृष्ट साहित्य, अपूर्ण व दर्शनी काम, आराखड्याचे उल्लंघन, चुकीचे लोकेशन, तसेच न केलेल्या कामांचेही बिल काढण्यात आले. या सर्व गैरव्यवहारात ठेकेदार उमेश शालिकराम झिबड यांच्यासह सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ठेकेदार उमेश झिबड यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी तीव्र
याशिवाय भ्रष्टाचार उघड केल्यावर तक्रारदाराला लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट ऑडिओ पुरावेही पडघान यांनी सादर केले आहेत. तक्रारीत उमेश झिबड यांच्या लायसनवरील सर्व कामांची पुनर्तपासणी व संपूर्ण अंकेक्षण याचा सोबत मागील १० वर्षांतील ग्रामपंचायतीच्या सर्व कामांचे थर्ड पार्टी अंकेक्षण, तसेच दोषींवर FIR नोंदवण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
आता या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन पुढे काय भूमिका घेते, तसेच कर्तव्यदक्ष सीईओ संजिता माहापात्रा या प्रकरणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहून कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणाचा निकाल संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर तक्रार प्रशासनाला सुपूर्त केले आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेश गायकवाड यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली असून त्यांनी सखोल चौकशी करून आवश्यक ती कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दलित वस्तीच्या नावावर चालणारा हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ठेकेदार उमेश झिबड यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणे गरजेचे आहे. गरज पडल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल – कपिल पडघान, क्रांतिकारी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष













Add Comment