विमानतळ सुरक्षेसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना
अमरावती
देशातील विमानतळांची सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) मोठा निर्णय घेतला असून, स्वदेशी बनावटीच्या स्फोटक अंश शोध यंत्रणा (Explosive Trace Detectors – ETD) पुरवठ्यासाठी वेहांत या कंपनीसोबत सुमारे ४० कोटी रुपयांचा करार केला आहे. या कराराअंतर्गत २३२ ‘नॅनोस्निफर’ ETD यंत्रे देशातील ६० पेक्षा अधिक विमानतळांवर बसविण्यात येणार आहेत. ही अत्याधुनिक मायक्रो-सेन्सर आधारित यंत्रणा १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत स्फोटकांचे सूक्ष्म अंश शोधण्यास सक्षम असून, त्यामुळे भारताच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षेत मोठी सुधारणा होणार आहे.
प्रमुख विमानतळांवर तैनाती
या यंत्रांची तैनाती चेन्नई, कोलकाता, पुणे, वाराणसी, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, पोर्ट ब्लेअर व कोयंबतूर यांसारख्या प्रमुख तसेच प्रादेशिक विमानतळांवर करण्यात येणार आहे. प्रवासी तपासणी, सामान तपासणी, कार्गो व ट्रान्झिट क्षेत्रांमध्ये या यंत्रांचा वापर केला जाणार आहे.
‘मेक इन इंडिया’चा यशस्वी प्रयोग
‘नॅनोस्निफर’ला २०२३ मध्ये AAI च्या मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत प्रायोगिक स्वरूपात २० यंत्रांची ऑर्डर देण्यात आली होती. ही यंत्रे गेल्या दोन वर्षांपासून सात विमानतळांवर यशस्वीपणे कार्यरत असून, त्यानंतरच मोठ्या प्रमाणावर खरेदीचा निर्णय घेण्यात आला.
IIT बॉम्बे व IIT दिल्लीचा संशोधन पाया
ही प्रणाली जगातील पहिली मायक्रोसेन्सर आधारित ETD प्रणाली असल्याचे सांगितले जाते. या तंत्रज्ञानाची संकल्पना २००८-०९ मध्ये IIT बॉम्बे येथे विकसित झाली. प्रिन्सिपल सायंटिफिक अॅडव्हायझर कार्यालय, MeitY तसेच DRDO-HEMRL यांचे संशोधनात्मक सहकार्य याला लाभले. ‘नॅनोस्निफ टेक्नॉलॉजीज’ या स्टार्टअपने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचे सहसंस्थापक डॉ. नितीन एस. काळे (वर्धा येथील सुरेशराव गोडे यांचे जावई), कपिल बर्देजा, प्रा. रामगोपाल राव व प्रा. सौम्यो मुखर्जी यांचा यात सहभाग आहे. नंतर या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापरासाठी वेहांतकडे तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आला.
आयात अवलंबित्व कमी होणार
या प्रकल्पामुळे स्फोटक शोध यंत्रणांमधील परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असून, देशांतर्गत डीप-टेक संशोधन व उत्पादनाला चालना मिळणार आहे.













Add Comment