धामणगाव रेल्वे

धामणगावच्या कराटेपटूंनी गाजवली अमरावतीची स्पर्धा ; १० विद्यार्थ्यांना २० पदकांची कमाई

कराटे चमूच्या दैदिप्यमान यशाने धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

धामणगाव रेल्वे : सचिन मुन

आत्मरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या धामणगाव रेल्वे येथील बोधी बुडोकान कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम विभाग-स्तरीय बुडो मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल २० पदकांची कमाई केली. अमरावती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत धामणगाव तालुक्यातील बोधी बुडोकान कराटे असोसिएशनच्या १० विद्यार्थ्यांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत दमदार कामगिरी करत पदकांवर आपले नाव कोरले.
या यशस्वी खेळाडूंमध्ये श्रेयश लसने, शिफाली हुमणे, संस्कृती टेकाम, मिताली पडोळे, नंदनी भेंडे, पृथ्वीका ढबाळे, सम्यक वासनिक, रोहन खोब्रागडे, गणेशा भिवरीकर आणि श्रीवत्स बोबडे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण २० पदके पटकावून धामणगाव रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
स्पर्धेचे आयोजन सेन्सई उमेश मोवाळे, सेन्सई विशाल चव्हाण आणि सेन्सई सागर मेश्राम यांनी केले होते. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्लॅक बेल्ट सोनाली गुप्ता आणि सम्यक दहाट यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देणारे ब्लॅक बेल्ट 3rd Dan, चॅम्पियन व मुख्य प्रशिक्षक मास्टर सचिन मून यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे धामणगावातील कराटेपटूंनी जिल्हास्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, या कामगिरीबद्दल प्रशिक्षक सचिन मून यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजच्या काळात विशेषतः मुलींसाठी आत्मरक्षणाचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. संकटाच्या प्रसंगी योग्य तंत्राचा वापर करून स्वतःचे संरक्षण करण्याचा आत्मविश्वास कराटेमुळे निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्येही कराटे प्रशिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या दैदिप्यमान यशाचे श्रेय भंते धम्मसार, आदिलाबाद येथील मुकेश कुमार कांबळे, तेलंगणा, आकाश पवार तसेच सर्व पालकांना देत प्रशिक्षक मास्टर सचिन मून यांनी त्यांचे आभार मानले.
धामणगावच्या या कराटेपटूंनी मिळवलेल्या २० पदकांमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!