धामणगाव रेल्वे

धामणगाव शहरात गौतस्करांचा उधम ; पोलीस प्रशासनअनभिज्ञ ?

कठोर कारवाईसाठी गौरक्षक धडकले दत्तपूर पोलीस ठाण्यात

धामणगाव रेल्वे

तालुक्यासह परिसरात सध्या गोवंश तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र समोर येत आहे. रात्रीच्या अंधारात तसेच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक माध्यमे व नागरिकांकडून वारंवार लक्ष वेधले जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य महामार्ग टाळून गावातील दुय्यम मार्गांद्वारे गोवंश वाहतूक केली जात असून, काही वाहनांमधून अमानुष पद्धतीने जनावरांची ने-आण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही तस्करी सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नसावी, याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिक व गोरक्षक संघटनांनी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “सामान्य नागरिकांना व माध्यम प्रतिनिधींना तस्करीसाठी वापरले जाणारे मार्ग आणि वाहने यांची माहिती मिळू शकते, तर पोलिसांना ती का मिळत नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी तर या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष अथवा मिलीभगतीची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. सतत वाढत असलेल्या गोवंश तस्करीमुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कायदे कठोर, मात्र कारवाई फक्त कागदावर?

राज्य शासनाने संघटित गोवंश तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. गरज भासल्यास ‘मकोका’सारख्या कठोर कायद्यांचा वापर करण्याबाबतही सूचना आहेत. तसेच पोलीस, आरटीओ आणि पशुसंवर्धन विभागाचे संयुक्त पथक तयार करून नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, धामणगाव रेल्वे परिसरात या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!