अमरावती

आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचा महाराष्ट्रात गुंतवणुकीचा प्रस्ताव; अमरावती महापालिकेवर गंभीर आरोप

अमरावती प्रतिनिधी –  सलील काळे  

भारतातील विविध क्षेत्रांतील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक व आर्थिक सहाय्य देण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त वित्तसंस्थेने महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. सेन्ट्रल वर्ल्ड बँक ऑफ ओ.एस.जे. (नाईट्स ऑफ माल्टा) यांच्या वतीने प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेस या संस्थेमार्फत ही गुंतवणूक करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे.
सेन्ट्रल वर्ल्ड बँक ऑफ ओ.एस.जे.च्या गव्हर्नर अंजली वसुंधरा इमरती यांनी अमरावती येथील, गेली वीस वर्षे नोंदणीकृत असलेल्या प्रवरा फायनान्शियल अँड अलाइड सर्व्हिसेसला अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. शासकीय, अर्धशासकीय व खासगी क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक व सहाय्य देण्याचा अधिकार या संस्थेला देण्यात आला असल्याचे पत्रात नमूद आहे.
२००५ पासून शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या या संस्थेचे नेतृत्व विजय सिताराम कुलकर्णी करीत असून, तुषार विजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत आहे. वीज निर्मिती, जलसंपदा, कृषी पायाभूत सुविधा, एसईझेड तसेच सार्वभौम कर्ज क्षेत्रात गुंतवणूक प्रस्ताव मांडण्याचा अधिकार संस्थेला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, अमरावती शहरातील स्मार्ट सिटीसह इतर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधीचा गैरवापर, भ्रष्टाचार व अपहार झाल्याचा आरोप करत ६० ते ७० अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी तुषार कुलकर्णी यांनी केली आहे. यासंदर्भात २०२१ -२२ , २०२२ -२३ व २०२३ -२४ या कालावधीतील शासकीय लेखापरीक्षण अहवालांच्या सत्य प्रती आपल्याकडे असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त यांनी आरोप फेटाळला

या आरोपांना अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ठामपणे फेटाळले आहे. संबंधित पत्रासोबत कोणतेही अधिकृत कागदपत्र, लेखापरीक्षण अहवाल किंवा पुरावे महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महापालिकेचे लेखापरीक्षण केवळ शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच होते आणि संबंधित संस्थेला शासनमान्यता असल्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!