अमरावती

डोळे वाड्यातील भाडेकरूंना जाळण्याची धमकी;  वाद तापला!

अमरावती प्रतिनिधी

डोळे वाडा परिसरातील रेल्वे स्टेशन ते बसस्टँड रोडवरील एका इमारतीत सुरू असलेल्या भाडेकरू व पोटभाडेकरूंमधील वाद चिघळला असून या प्रकरणात पेट्रोल टाकून दुकाने जाळण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात मोहीत अग्रवाल, अमोल सुर्यवंशी आणि पवन मुलानी या तीन पोटभाडेकरूंनी अमरावती शहराचे पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील चार ते पाच वर्षांपासून ते नंदीनी डोळे यांच्या मालकीच्या इमारतीतील तळमजल्यावरील दुकाने पोटभाडेकरू म्हणून चालवित आहेत.
सदरह इमारतीतील मूळ भाडेकरू सुमित खंडेलवाल यांनी ही दुकाने त्यांना पोटभाडेकरू म्हणून दिली होती. दरम्यान, घरमालक नंदीनी डोळे यांनी ही मालमत्ता विक्री करण्याचे ठरवले असून उमेश बोरखडे यांना विक्रीचा व्यवहार सुरू आहे. यावेळी दुकाने खाली करण्याच्या बदल्यात प्रत्येक पोटभाडेकरूला २१ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे ठरले होते. मात्र खंडेलवाल यांनी हा करार फेटाळत पोटभाडेकरूंना केवळ १ लाख आणि स्वतःला २० लाख रुपये देण्याची मागणी करत वाद निर्माण केला. हा वाद चिघळल्याने त्यांनी संबंधित दुकानदारांचा वीजपुरवठा बेकायदेशीरपणे तोडला असून, अलीकडेच पेट्रोल टाकून दुकाने जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
या प्रकरणी पोटभाडेकरूंनी ६ ऑक्टोबर रोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात खंडेलवाल आणि उमेश बोरखडे यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे. तसेच सदर वाद न्यायालयीन तडजोडीसाठी जिल्हा न्याय प्राधिकरणाकडे अर्ज दाखल केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. भाडेकरूंनी पोलिस आयुक्तांकडे विनंती केली आहे की, खंडेलवाल आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध त्वरीत प्रतिबंधक कारवाई करून संभाव्य अनर्थ टाळावा.
(सदर प्रकरणावरून डोळे वाडा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून या वादाची गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.)
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!