सामाजिक

राजेश काकडे ठरले गावासाठी ‘जलदूत’ ; पत्नीचे दागिने विकून भागवली गावाची तहान!

जनसूर्या मीडिया

उन्हाच्या झळांमध्ये मराठवाडा होरपळतोय. टंचाईमुळे अनेक गावांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जरुड (ता. बीड) या गावातील राजेश काकडे यांनी एक आदर्श उपक्रम सुरू केला. गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने विकून नवीन कूपनलिका खोदली. त्यातील पाणी ते ग्रामस्थांना मोफत उपलब्ध करून देत आहेत. गाव त्यांना ‘जलदूत’ म्हणून संबोधत आहे.
जरुड गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजारांच्या आसपास आहे. गावाला पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीची विहीर आहे. या विहिरीत तळ्यातील पाणी सोडून गावात पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी पिण्यायोग्य नसते. त्यातच उन्हाळ्यात पाणीपातळी घटली की गावाला टंचाईचा सामाना करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील राजेश काकडे यांनी पुढाकार घेतला. आपली तीन एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी कूपनलिका खोदली आणि डाळिंब आणि उसाची लागवड केली. परंतु, २०१४ मध्ये पडलेल्या दुष्काळात गावात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी गावकऱ्यांना त्यांच्या या कूपनलिकेचा आधार मिळाला. राजेश यांनीही आपल्या शेतासाठी आधी घेतलेल्या कूपनलिकेतील पाणीसाठा शेतीपेक्षा गावासाठी अधिक महत्त्वाचा मानला आणि शेतातील डाळिंब आणि ऊस मोडीत काढला. परंतु, काही दिवसांपूर्वी या कूपनलिकेचे पाणी आटले. आता गावकऱ्यांना पाणी कसे द्यावे, हा प्रश्न राजेश यांना स्वस्थ बसू देईना.
त्यातून त्यांनी नवीन कूपनलिका घेण्याचे ठरवले. यासाठी सुमारे दीड लाखाचा खर्च अपेक्षित होता. आवश्यक पैसे जवळ नसल्याने अखेर त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने (झुंबर, नेकलेस) विकून नवीन कूपनलिका खोदली. त्यांच्या या उपक्रमाला पत्नीचीही साथ मिळाली. त्यांच्यामुळे सध्या जरुड, शिवणीफाटा, बाबुळीखुटा , खुटेवाडी या गावातील ग्रामस्थांना आपल्या हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे.

घरासमोर टाक्यांची सोय

नवीन कूपनलिका खोदल्यानंतर राजेश यांनी आपल्या घरासमोर मोठ्या पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. गावकरी कोणत्याही वेळी येऊन पाणी भरू शकतील, हा त्यामागचा उद्देश. गावात कुणाकडे लग्नसमारंभ किंवा अन्य कार्यक्रम असला की राजेश स्वतःच्या वाहनात पाण्याच्या टाकी भरून कार्यक्रमस्थळी पोचवतात. त्यांचे हे निःस्वार्थ सेवा कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

समाजसेवेचा वसा वडिलांकडूनच मिळाला. आपण केलेल्या सेवेमधून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिले की खूप समाधान मिळते आणि तीच खरी कमाई आहे, असे वाटते.
– राजेश काकडे, जरुड, ता. बीड

वर्षानुवर्षे गावात पाण्याचा मोठा प्रश्न होता. परंतु राजेश यांच्यामुळे तो कायम सुटला आहे. पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबली असून राजेश हे आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत.
– जालींदर काकडे, ग्रामस्थ.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!