तरुणांमध्ये विवेक प्रज्वलित झाला तरच देश महासत्ता बनेल
मोर्शी : (जितेंद्र श्रीनाथ)
“देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांच्या मनात विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी जागृत झाली पाहिजे. मगरीशी वैर नको, पण अन्याय, अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रवाहाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य प्रत्येक युवकामध्ये असले पाहिजे. युवक ही समाजातील सर्वाधिक कृतिशील शक्ती असून त्यांच्या सकारात्मक सहभागातूनच परिवर्तन शक्य आहे,” असे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त मा. तुकाराम मुंडे (भा. प्र. से.) यांनी केले.
स्वामी विवेकानंद संभागृह येथे आयोजित “संवाद तरुणांशी” या प्रेरणादायी कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, नेतृत्व, सामाजिक जबाबदारी, प्रामाणिक प्रशासन, संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका याविषयी त्यांनी उपस्थित तरुणांशी मनमोकळा संवाद साधला.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन कुटीर खादी यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन यांच्यासह विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
संवाद सत्रादरम्यान उपस्थित युवकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मा. मुंडे यांनी आपल्या प्रशासनातील अनुभवांच्या आधारे युवकांना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, सामाजिक संवेदनशीलता आणि विवेकनिष्ठ जीवनमूल्ये स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक तरुणाने केवळ स्वतःच्या यशाचा विचार न करता समाजहित, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रहित जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही सांगितले.















Add Comment