अमरावती क्राईम

नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी बायकोने मावस भावालाच दिली १२०० रुपयाची सुपारी ; अमरावतीमध्ये खळबळ

अमरावती प्रतिनिधी

नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी बायकोने सुपारी देत त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावतीच्या खोलापुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. नवऱ्याला अद्दल घडवण्याचा कट रचत १२०० रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेने मावसभावालाच ही सुपारी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बायकोसोबत दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवून हॉकी स्टिकने मारहाण करत त्याच्याकडे असलेला ९५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. ही घटना अमरावतीच्या खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना जी माहिती समोर आली ते पाहून पोलिसही चक्रावले. या मारहाण आणि लुटमारी प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉडला यश आले आहे. अवघ्या १२०० रुपयांत बायकोनेच पतीला बेदम मारहाण करून त्याला अद्दल घडविण्याची सुपारी दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले. मावसभावाच्या मदतीने तिने नवऱ्याला लुटल्याचे तपासातून समोर आले. लग्नाआधी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यामुळे नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी महिलेने हे कृत्य केले.
या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीच्या बायकोसह तिचा मावसभाऊ आणि त्याचे दोन साथीदार अशा चौघांना अटक केली. येरला येथील रहिवासी व्यापारी अजय संजय राठी हे पत्नीसोबत दुचाकीने अकोली रेल्वे फाटकाच्या डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्याचवेळी तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हॉकी स्टिकने मारहाण करून जखमी केले होते आणि त्यांच्याकडचे ऐवज लुटले होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!