वर्धा-

माजी खासदार रामदास तडसांना राम मंदिरात प्रवेश नाकारला

तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही, बाहेर निघा” ; सोवळं अन् जानवं न नेसल्याने माजी खासदारांना राममंदिरात प्रवेश नाकारला

वर्धा प्रतिनिधी

देशभरात काल रामजन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. मात्र या जन्मोत्सवात वर्ध्यात रामनवमीच्या कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली आहे. माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. रामदास तडस यांच्या अंगात जानवं आणि सोवळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन रामदास तडस आणि मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद झाला असल्याची माहिती देखील पुढे येत आहे.

 

“नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, बाहेर निघा,”

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील राम मंदिरात रामदास तडस यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. रामदास तडस हे दरवर्षीप्रमाणे रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी भाजपचे काही पदाधिकारीही मंदिरात दर्शनासाठी आले होते. रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जायचे होते. त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा सुरु होती. रामदास तडस यांनी गाभाऱ्यात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी पूजा थांबवली. “तुम्ही जरा लांबच राहा, तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही. नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, बाहेर निघा,” असे मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटल्याने रामदास तडस संतापले. यानंतर रामदास तडस आणि मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद झाला.
रामदास तडस यांनी पुजाऱ्यांना त्यांना रामाची पूजा का करता येणार नाही, याबद्दलचे कारण विचारले. तेव्हा पुजाऱ्यांनी तुम्ही सोवळे नेसलेले नाही, बाहेर निघा, असे म्हटले. यावर रामदास तडस यांना काय बोलावे, हे सुचेनासे झाले होते. त्यानंतर अधिक वाद टाळण्यासाठी रामदास तडस यांनी बाहेरुनच श्रीरामाचे दर्शन घेतले आणि ते मंदिरातून बाहेर पडले.

रामदास तडस यांची पुजाऱ्यांवर टीका

घडलेल्या सर्व प्रकाराविषयी रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी,”देवळीच्या मंदिरातील पुजारी कुटुंब पिढीजात आहे. मी दरवर्षी राम नवमीच्या दिवशी दर्शनाला जातो. मी ४० वर्षांपासून अशाप्रकारे रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात दर्शनासाठी जातो. मी राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन रामलल्लांची पूजा करतो. यावेळी माझी पत्नी, कार्यकर्ते सोबत असतात. राम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी दिवसभराच्या कार्यक्रमाला जात असतो. पण यावर्षी आम्ही राम मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्याने अडवलं. संबंधित पुजारी हाच मंदिराचा ट्रस्टी आहे. तो पुण्याला राहतो. फक्त रामनवनीच्या दिवशी मंदिरात येतो. आम्ही वर्षानुवर्षे या मंदिरात जात असल्याने आमची रामावर आस्था आहे. पण पुजाऱ्यांनी हे काय सोवळे-ओवळे लावले आहे? तुम्ही एक दिवसासाठी येता आणि नियम सांगता हे बरे नव्हे, “असे रामदास तडस यांनी म्हटले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!