अमरावती

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट स्वाक्षरीसह लेटरहेड जिल्हाकार्यालयात

अज्ञातांकडून वरिष्ठ लिपिकावर कारवाई साठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अमरावती : प्रतिनिधी

महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट लेटरहेड व बनावट सही करून एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे.
वरुड येथील एका वरिष्ठ लिपिकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना १० मार्चला पाठविण्यात आले आहे. हे पत्र चक्क पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने असून त्यांच्या बनावट स्वाक्षरीचे लेटरहेड देण्यात आले. लेटरहेडवर मध्यभागी मंत्री, महाराष्ट्र शासन व राजमुद्रा छापण्यात आली आहे. टपालाने हे पत्र पाठविण्यात आले आहे. पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी योगेश कोठेकर मंगळवारी (ता. एक) येथील पालकमंत्री कार्यालयात कामकाज करीत असताना त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक लेटरहेड प्राप्त झाले.
त्याचे सूक्ष्म निरीक्षण व अवलोकन केले असता अज्ञात इसमाने पालकमंत्र्यांचे बनावट लेटरहेड बनविले असून त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची बनावट सही केल्याचे निदर्शनास आले व हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. योगेश कोठेकर यांनी तत्काळ पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी संपर्क साधत सविस्तर चर्चा करून ती स्वाक्षरी व लेटरहेड बनावट असल्याचे स्पष्ट केले. संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना दिले आहेत.

काय आहे पत्रात

१० मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त बनावट पत्रात वरुड नगरपालिकेतील एका लिपिकाने वरिष्ठांच्या आशीर्वादाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागात प्रतिनियुक्ती मिळविली आहे. हा लिपिक तेथेही उपस्थित राहत नसून तो नागरिकांचे फोनही घेत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. तो दादागिरीची भाषा वापरत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याचेही नमूद आहे. या लिपिकाची नेमणूक रद्द करण्यात यावी व त्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, असे नमूद आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!