प्रशासन कार्यवाही

अत्याचारी लोकेश्वर स्वामीचा राम मंदिर मठ बुलडोझर लावून केला जमीनदोस्त; आठ एकर क्षेत्रांवरील कब्‍जा हटवला

रायबाग : जनसूर्या मीडिया

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या मेखळी येथील राम मंदिर मठाच्या लोकेश्वर स्वामीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे अनेक कारनामे पुढे आले आहेत. हा मठ त्याने सरकारी गायरान जमिनीत अवैधरीत्या थाटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रायबाग तालुका प्रशासनाने हा मठ तीन बुलडोझर लावून गुरुवारी (ता. २९) सकाळी जमीनदोस्त केला.
येथे लोकेश्वर स्वामी याने राम मंदिर निर्माण करून त्याच्या माध्यमातून सुमारे आठ एकर क्षेत्रात मठाचे बांधकाम केले होते. अनेकांकडून देणगी घेऊन त्याने हा मठ उभारल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याच्या कारनाम्याने या भागातील लोकांनी संतप्त होऊन यावर कारवाईची मागणी केली होती. प्रशासनाने माहिती घेतल्यानंतर हा मठच अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर रायबागचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी हा मठ अनधिकृत असल्याची माहिती घेऊन तो हटविण्यासाठी कार्यवाही केली. गुरुवारी सकाळीच तहसीलदारांनी आपल्या नेतृत्वाखाली तीन बुलडोझर लावून हा मठ जमीनदोस्त केला. यावेळी मठ हटविण्याच्या कामात कुणीही आडकाठी आणली नाही. तरीही प्रशासनाने खबरदारी म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त मागवून घेतला होता. दुपारपर्यंत या मठाचा परिसर संपूर्ण मोकळा करण्यात आला.
आठ वर्षांपूर्वी या लोकेश्वर स्वामीने येथे मठाचे बांधकाम केले होते. हळूहळू विस्तार वाढवत त्याने आठ एकर क्षेत्र व्यापले होते. प्रारंभी हा भाग वनखात्याच्या अखत्यारीतील क्षेत्र असल्याचे मानले जात होते. पण, तालुका प्रशासनाने माहिती घेतल्यानंतर मेखळी येथील गायरान जमिनीचे हे क्षेत्र असल्याने २२५ सर्व्हे क्रमांकावरील ही जागा गुरुवारी सकाळी मोकळी करण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी, तहसीलदार यांच्यासह पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
मेखळी येथे राहणाऱ्या या स्वामीने सतरा वर्षीय मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने रायचूर, बागलकोट येथे नेऊन लॉजवर अत्याचार केले होते. त्यानंतर बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील बसस्थानकावर सोडून याची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या मुलीने घर गाठून ही माहिती कुटुंबाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर अनेक भाविकांनी मठावर धाव घेऊन संताप व्यक्त केला होता. तालुका प्रशासनाने या दिवसापासूनच कारवाई सुरू करून हा मठ अधिकृत असल्याचा दुजारो दिला होता. स्वामी सध्या कारागृहात आहे. स्वामीचा कारनामा उघडकीस आल्यानंतर भाविकांनी व पोलिसांनी मठात तपासणी केल्यावर तेथे तलवार, जांबिया, कोयते अशी शस्त्रे आढळली होती.

मठातील वस्तू आधीच बाहेर

स्वामीला अटक केल्यानंतर अनेकांनी मठाकडे धाव घेऊन संताप व्यक्त केला होता. मठातील काही वस्तू इतर धार्मिक ठिकाणी नेल्या, तर काहींनी अनेक वस्तू नेल्या होत्या. फ्रीजसह अनेक वस्तू यापूर्वीच लोकांनी नेल्या. आता मोठा परिसर व्यापलेला डौलदार मठ प्रशासनाने जमीनदोस्त केला.

मेखळी येथील मठाचे बांधकाम अतिक्रमण करून अवैधरीत्या केले होते. महसूल खात्याची ही जमीन होती. त्यानुसार संबंधित मठाला नोटीस देऊन बांधकाम गुरुवारी हटविले. यापुढे येथे कोणत्याही अनधिकृत बांधकामाला थारा दिला जाणार नाही.

-सुरेश मुंजे, तहसीलदार, रायबाग

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!