अमरावती प्रशासन

अमरावती महानगर पालिकेत २८ दिवसातच AIMIM चा नगरसेवक अपात्र

आयुक्त सौम्या शर्माचा मोठा निर्णय

अमरावती प्रतिनिधी

अमरावती महापालिकेतील एमआयएमचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक मुनज्जर अली यांना कंत्राटदारीच्या मुद्यावरून अखेर अपात्र ठरविण्यात आले आहे. महापालिका रेकॉर्डवर ते कंत्राटदार असल्याचा ठपका ठेवत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी १६ मार्च रोजी याबाबतचे आदेश जारी केले.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम १० (फ) व १० (ग) अन्वये, महापालिकेचे कंत्राटदार असलेली व्यक्ती नगरसेवक म्हणून पात्र राहत नाही. मुनज्जर अली यांच्या नियुक्तीवेळी ते महापालिकेच्या कंत्राटाशी संबंधित असल्याचे नोंदीत नमूद असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. मुनज्जर अली यांची २० फेब्रुवारी २०२६ रोजी स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, केवळ काही दिवसांतच २७ फेब्रुवारी रोजी त्यांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती.

ईटकॉन कंपनीशी संबंध ठरला निर्णायक

महापालिकेच्या तपासणीत ईटकॉन ई-सोल्यूशन प्रा. लि. (नोएडा) व ईटकॉन प्रा. लि. गो सोल्यूशन (अमरावती) यांच्या निविदा प्रक्रियेत सहभाग आढळून आला. मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ८ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आलेल्या करारनाम्यावर मुनज्जर अली यांची स्वाक्षरी असल्याचे समोर आले. हा करार ७ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात आला असला तरी, संबंधित नोंदीमुळे त्यांची पात्रता प्रश्नात आली.

नगरसेवकाची हायकोर्टात धाव

९ मार्च २०२६ रोजी सादर झालेल्या समिती अहवालानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण यांनी कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाविरोधात मुनज्जर अली यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता न्यायालयीन वळण मिळाले असून पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!