धामणगाव रेल्वे

सायबर क्राईम प्रकरणात धामणगाव कनेक्शन उघड 

पांडे ले आऊट मधील आरोपी शिवाजी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल 

धामणगाव प्रतिनिधी

सोशल मिडीयाच्या माध्यमातून सातत्याने वाढत चाललेल्या सायबर क्राईम प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे प्राप्त होत असताना त्याचे धागेदोरे धामणगावात शहरात सुद्धा पसरले असल्याचे दत्तपूर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सायबर फसवणुकीच्या तक्रारींच्या तपासादरम्यान धामणगाव रेल्वे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील एका बँक खात्याचा वापर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी व ती पुढे वळवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी पोलीस शिपाई सोनू भालेराव यांच्या तक्रारीवरून आरोपी शिवाजी सुभाष चव्हाण, रा. मंगेश शिसोदे यांच्या घरी पांडे लेआउट, जुना धामणगाव यांच्याविरुद्ध दत्तापूर पोलिस ठाण्यात (बीएनएस ) २०२३ मधील कलम ३१७(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच बॅक खात्याविरोधात देशभरात ६ तक्रारीच्या नोंदी  

दत्तापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले शिपाई सोनू भालेराव हे सायबर विषयक कामकाज पाहत असून, गृह मंत्रालयाच्या National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वरील तक्रारींच्या मनी ट्रेलच्या तपासात धामणगाव रेल्वे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील खाते क्रमांक ३४९४५७६६२५ संशयास्पद असल्याचे समोर आले. तपासादरम्यान या खात्याविरुद्ध देशभरातून सहा सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद झाल्याचे आढळले. या तक्रारींमधील एकूण ३ लाख, ८४ हजार,९२९ रुपये इतकी फसवणुकीची रक्कम संबंधित खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, रक्कम जमा होताच ती विविध माध्यमांतून तात्काळ काढून किंवा पुढे वळविण्यात आली असून खात्यात केवळ ९ रुपये २० पैसे इतकी शिल्लक राहिल्याचे तपासात उघड झाले.
तांत्रिक विश्लेषण व बँकेकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे हे खाते शिवाजी सुभाष चव्हाण, रा. पांडे लेआउट, जुना धामणगाव यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित खात्याचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली बेकायदेशीर रक्कम स्वीकारणे व तिचे व्यवहार करण्यासाठी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत असून, सायबर फसवणूक करणाऱ्या संघटित टोळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीच्या आमिषांना, ऑनलाइन नोकरीच्या आमिषाला किंवा डिजिटल अटकेच्या धमक्यांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!