धामणगाव रेल्वे सामाजिक

अंजनसिंगीत भव्य कापूस शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

धामणगाव रेल्वे

दि. २४ मार्च २०२६ रोजी अंजनसिंगी येथे “सिटी सीडीआरए महाराष्ट्र – कोल्याबोरेटिव्ह प्रोजेक्ट” अंतर्गत भव्य कापूस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन डॉ. अतुल पी. कळसकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, घातखेड), डॉ. मुक्तार शेख (शास्त्रज्ञ, जीटीसी, आयसीएआर, सिरकॉट, नागपूर) व गजानन राऊत (तालुका कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी डॉ. समीर वड्याळकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ अंकुर सीड्स, दिलीप ठाकरे, प्रगतिशील शेतकरी एचडीपीएस अकोला, प्रशांत टेकाडे, व्यवस्थापक इंडो काउंट इंडस्ट्रीज, शुभम ढोणे, क्लस्टर प्रमुख झायडेक्स, रवींद्र दप्तरी, बियाणे उत्पादक, वर्धा, नामदेवराव वैद्य, प्रगतिशील शेतकरी धामणगाव रेल्वे, गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक महाराष्ट्र राज्य आणि जगदीश नेरलवार, प्रकल्प अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

प्रास्ताविकात गोविंद वैराळे यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे महत्त्व आणि एचडीपीएस तंत्रज्ञानामुळे उत्पादनात झालेली वाढ यावर प्रकाश टाकला. डॉ. अतुल कळसकर यांनी कृषी विज्ञान केंद्रांतर्गत विविध योजना, यांत्रिकीकरण व खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सिटी-सीडीआरए तर्फे शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कापडी पिशव्यांचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. मुक्तार शेख यांनी कापसाची गुणवत्ता, कंटॅमिनेशन कमी करण्याचे उपाय आणि बायोचार निर्मिती यावर सविस्तर माहिती दिली. गजानन राऊत यांनी नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प, पोखरा योजना, बीज प्रक्रिया व शून्य मशागत पद्धती यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. समीर वड्याळकर यांनी एचडीपीएस पद्धतीसाठी योग्य बियाणे व कीटकनाशकांबाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी एचडीपीएस तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव सांगत अधिक उत्पादन मिळविण्याचे मार्ग स्पष्ट केले आणि “कस्तुरी कॉटन” या भारतीय ब्रँडबाबत माहिती दिली. प्रशांत टेकाडे यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, तसेच कार्बन क्रेडिट व कार्बनमुक्त शेती याबाबत मार्गदर्शन केले. शुभम ढोणे यांनी सेंद्रिय व शाश्वत शेती तसेच रीजनरेटिव्ह फार्मिंगवर माहिती दिली.
प्रगतिशील शेतकरी नामदेवराव वैद्य यांनी एचडीपीएस पद्धतीद्वारे प्रति एकर साडेबारा क्विंटल उत्पादन घेतल्याचा अनुभव मांडला व शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले. जगदीश नेरलवार यांनी मॉइश्चर मीटरचा वापर, स्वच्छ व कंटॅमिनेशनमुक्त कापूस उत्पादन आणि त्यातून अधिक भाव मिळविण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी व कापूस विस्तार स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील सुमारे १८० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. विविध कृषी कंपन्या व शासकीय योजनांचे स्टॉल्सही आकर्षण ठरले.
कार्यक्रमाची सांगता जगदीश नेरलवार यांनी आभार प्रदर्शन करून झाली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!