धामणगाव रेल्वे

हक्काच्या रस्त्यासाठी ७५ वर्षीय वृद्ध शेतकरी महिलेचे आमरण उपोषण

रस्ता रस्ता करता पती वारले ; आता तरी रस्ता मिळेल का ?

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील कामनापूर घुसडी येथील वयोवृद्ध शेतकरी पुंडलिक बोरकर वय – ८३ वर्ष यांची शेतीच्या रस्त्यासाठी मागील ५ वर्षांपासून तहसील कार्यालय धा. रे येथे पायपीट सुरु होती. रस्त्याच्या प्रकरणात त्यांच्याबाजूने निकाल लागला. एवढेच नाही तर प्रकरण अपीलसाठी उपविभागीय अधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांनी सुद्धा पुंडलिक बोरकर याच्या शेताला असणारा रस्त्याचा आदेश कायम ठेवत तो मोकळा करून देण्याची कार्यवाही करण्याबाबत तहसील कार्यालयाला आदेशित केले. मात्र तसे असताना देखील अध्यापपर्यंत बोरकर याना रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही. सदरचा विषय फेब्रुवारी २०२२ पासून ते अध्यापर्यंत सुरु असून या कालावधीत रस्त्यासाठी पायपीट करत असताना २३ सप्टेंबर २०२५ रोजी वयोवृद्ध शेतकरी पुंडलिक बोरकर यांची प्राणज्योत मावळली. मात्र शेतकरी बोरकर याना न्याय मिळाला नाही.
बोरकर कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे शेतीच साधन असल्याने मागील ५ वर्षात शेतीला हक्काचा रस्ता असून देखील तो मोकळा करून न दिल्याने बोरकर कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसान बळजबरीने सहन करीत असताना त्या काळजीपोटी एका पत्नीचा म्हातारपणाचा आधार तर एका पुत्राने आपला बाप गमावला असून देखील या निगरगठ्ठ प्रशासनाला कुठलीही कीव त्यांच्या बद्दल येत नाही ही आजच्या युगात मानवतेला काळिमा फासणारी बाब आहे तर वडील वारले म्हणून मुलाने रस्त्याबाबत तहसीलदार अभय घोरपडे याना रस्ता मोकळा करून देण्याबाबत विनवणी केली असता त्यांनाच आपल्या ऑफिस मधून हाकलून लावत त्यांचा अपमान केल्याचा आरोप शेतकरी पुंडलिक बोरकर यांच्या मुलाने केला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात तहसीलदार अभय घोरपडे यांनी जाणीवपूर्वक रस्ता मोकळा करून न देता जातीवाचक बोलून अपमानित करून ऑफिसमधून हाकलून दिल्याने त्यांच्यावर कार्यवाही करून ५ वर्षाची नुकसान भरपाई मिळावी असे नमूद केले आहे.
वरिष्ठांचे आदेश असताना तसेच शासनाचा आदेशित प्रकरणात ३ महिन्याच्या आत रस्ता मोकळा करून देण्याबाबत परिपत्रक असताना देखील रस्ता रस्ता करता प्राणज्योत मावळलेल्या शेतकरी पुंडलिक बोरकर यांच्या ७५ वर्षीय पत्नी वेणूबाई पुंडलिक बोरकर यांनी आज दि. २३ जानेवारी २०२६ पासून तहसील कार्यलयात समोर आमरण उपोषणाचे हत्यार उपोसले आहे. जोपर्यंत रस्ता मोकळा करून ५ वर्षाची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मरण आले तरी चालेल पण आता मागे हटणार नाही अशी भूमिका वेणूबाई बोरकर यांनी घेतली आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या समोर तहसील प्रशासनासमोर उभे ठाकलेले आव्हान यावर तहसीलदार काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या संदर्भात तहसीलदार यांच्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, तर लवकरच सामंजस्याने उपोषणावर तोडगा काढून रस्ता मोकळा करून देण्यात येईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!