धामणगाव रेल्वे

अंजनसिंगी दलितवस्ती रस्ता भ्रष्टाचार प्रकरण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात

मंत्री जयकुमार गोरे कडून सदर प्रकरणावर तात्काळ कारवाईचा आदेश

धामणगाव प्रतिनिधी 

          तालुक्यातील अंजनसिंगी ग्रामपंचायत, वार्ड क्रमांक ४ मधील दलित वस्ती रस्ता कामात झालेले कथित गंभीर भ्रष्टाचार प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. मात्र सदर प्रकरण राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या दालनात पोहोचले असून त्यांनी प्रशासनाला तात्काळ चौकशी करून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदाराने आजपर्यंत राज्यात व जिल्ह्यात केलेल्या सर्व विकासकामांची सखोल चौकशी व अंकेक्षण करण्याचे निर्देशही मंत्री गोरे यांनी दिले आहेत.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी मंत्रालयात मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या रस्ता कामात मंजूर आराखड्याचे उल्लंघन, चुकीच्या ठिकाणी काम दाखवणे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे व अपूर्ण काम करून शासन निधीचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
पडघान यांनी मंत्री गोरे यांच्यासमोर प्रत्यक्ष स्थळपाहणीदरम्यान काढलेले फोटो, व्हिडिओ व ऑडिओ स्वरूपातील ठोस पुरावे सादर केले. या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ठेकेदाराकडून तक्रार मागे घेण्यासाठी थेट आर्थिक लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. हा प्रकार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मंत्री जयकुमार गोरे यांनी केवळ सदर रस्ता कामाचीच नव्हे, तर संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या सर्व कामांची स्वतंत्र चौकशी, थर्ड पार्टी ऑडिट व अंकेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई, गुन्हे दाखल करणे व गरज भासल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याबाबतही सकारात्मक भूमिका मंत्री गोरे यांनी घेतली.
दलित वस्तीच्या विकासासाठी आलेल्या निधीचा अपहार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मंत्री गोरे यांनी दिला असून, या प्रकरणात लवकरच ठोस कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!