आरोग्य विषयक धामणगाव रेल्वे

गंगाजळी येथील अंगणवाडी आणि आशा सेविकेचा प्रताप ; बाळाचे प्रत्यक्षात वजन न करता नोंदवहीमध्ये वजन जास्त नमूद

आपल्या मागची कामे वाढतील म्हणून बालकांच्या आरोग्याशी खेळ 

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

धामणगाव तालुक्यातील गंगाजळी या छोट्याश्या गावातून अंगणवाडी आणि आशा सेविकेचा अफलातून प्रताप उघडकीस आला आहे. आपल्यामागची कामे वाढतील म्हणून चक्क बालकाच्या आरोग्य संबंधित वरिष्ठाना कुठल्याही प्रकारची माहिती न देता चिमुकल्याच्या आरोग्याशी खेळण्याचा महाप्रताप या दोन्ही सेविकेकडून करण्यात आला आहे. खरतर माता गरोदर असतानापासून ते बाळ ३ ते ५ वर्ष पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी मातांना त्यांच्या खान पान विषयी मार्गदर्शक करणे, बाळाच्या, मातांच्या आरोग्याबाबत वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून त्याच्या आरोग्यासंदर्भात नोंदी आपल्याकडे नोंद करून ठेवत त्यांची माहिती आपल्या वरिष्ठाकडे देण्याचे कामासाठी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आली आहे. याचा मुख्य उद्देश मातांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा हा आहे. या दोन्ही सेविकेचा समन्वयाने बालकांमध्ये काही उणिवा असल्यास त्या आपल्या वरिष्ठांकडे सांगून त्यावर उपाययोजना करण्याचे काम असताना गंगाजळी येथील दोन्ही सेविकेना याचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे.

आशा आणि अंगणवाडी सेविकेला पडला आपल्या कर्तव्याचा विसर

गंगाजळी या संपूर्ण गावात २०२४-२५ या वार्षिक मध्ये फक्त एकच नवजात बाळ आहे. त्या संदर्भात गावातील आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी बाळाच्या मातेसोबत फक्त फोनद्वारे संपर्क साधून विचारपूस केली, आणि फक्त आहार देताना फोटो काढण्यासाठी घरी भेट दिली. त्या व्यतिरिक्त बाळाच्या मातेला गरोदर असतानापासून ते आज रोजी बाळ १० महिन्याचे होत असताना सुद्धा वरिष्ठाकडून मिळणारी माहिती पुरविली नसून कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. तसेच दर महिन्याला बाळाचे वजन न करता अंगणवाडी सेविकेने आपल्या नोंदवहीमध्ये बाळाचे वजन जास्त असल्याचे नमूद केले आहे. जेव्हा कि, १० महिन्याच्या तुलनेत बाळाचे वजन हे धोकादायक क्षेत्रात येत असून सुद्धा फक्त आणि फक्त आपल्या मागचे कामे वाढतील म्हणून त्यांनी बाळाला सुदृढ असल्याचे सांगून वरिष्ठांची फसवणूक केली आहे.
या संदर्भात अंगणवाडी सेविकेला वजन जास्त का लिहले असा जाब विचारला असता चुकून लिहण्यात आले. मी नोंदवहीवरच खोडून टाकते, असे म्हटले, त्यावर आपण वजनच केले नाही तरी दोन महिन्याचे जास्त वजन नोंदवहीवर लिहलेच कसे विचारले असता बाळाचे लसीकरण आहे म्हणून आम्हाला ते लिहावेच लागते तसेच सुरुवातीच्या १ ते ३ महिण्यापर्यंत आम्हाला बाळाचे वजन वाढवूनच लिहावे लागत असल्याचे बेजाबदारपणे सांगितले.

अंगणवाडी सेविकेच्या नोंदवहीची पाहणी केली असता उघडकीस आला धक्कादायक प्रकार

सदरचा संपूर्ण विषय २० मे रोजी बाळाचे ९ ते १२ महिन्याचे लसीकरण असल्याने बाळाचे वडील स्वतः हजर असताना अंगणवाडी सेविकेची नोंदवही निदर्शनास आली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात पालकाने तीव्र नाराजी व्यक्त करताना दोन्ही सेविकेची रीतसर तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

तक्रार करताच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बाळाच्या घरी भेटी

सदर विषयाची तक्रार करताच वरिष्ठांकडून तातडीने दखल घेत दुसऱ्याच दिवशी आरोग्य केंद्र अंजनसिंगी येथील प्रमुख एम. ओ. डॉ. विवेक सेदुवाद यांनी आपल्या टीम सह भेट दिली असता या दोन्ही सेविकेची चांगलीच कानउघाडली केली असून बाळाच्या पुढील उपचारासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे पालकांना आश्वासित केले आहे. यावेळी डॉ. प्रिया मोरे, डॉ. आर. ए. ढोरे, एच. व्ही राजेंद्र चंदने, आशा गटप्रवर्तिका विद्या महात्मे उपस्थित होत्या. तसेच एकात्मिक बालविकास तालुका अधिकारी गायत्री चव्हाण यांनी सुद्धा बाळाच्या घरी भेट दिली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!