देश धक्कादायक

६३ वर्षीय आरोपीकडून भर कोर्टातच महिला न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी

‘तू है क्या चीज…. तू बाहर मिल, देखते हैं कैसे जिंदा घर जाती है’

जनसूर्या मीडिया

दिल्ली न्यायालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आरोपीला कोर्टाने दोषी धरल्यानंतर त्या आरोपीसह वकिलाने महिला न्यायाधीशांनाच धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या न्यायाधीशांना शिवीगाळही करण्यात आली आहे. आपल्याबाजूने निकाल न सुनावल्याने संतापलेल्या आरोपीने न्यायाधीशांच्या अंगावर एक वस्तू फेकण्याचाही प्रयत्न केला होता.
दिल्लीतील द्वारका येथील प्रथम वर्ग सत्र न्यायालयात २ एप्रिलला घडलेला हा प्रकार आता समोर आला आहे. न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी संबंधित आरोपीला धनादेश न वठल्याच्याप्रकरणात दोषी धरले होते. त्यानंतर या आरोपीने त्यांना ‘तू है क्या चीज…. तू बाहर मिल, देखते हैं कैसे जिंदा घर जाती है’, अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी दोषी धरताना आपल्या आदेशात या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘दोष सिध्द झाल्यानंतर आरोपी आणि त्याच्या वकिलाने मानसिक आणि त्रास दिला. तसेच आरोपीला मुक्त करावे अन्यथा माझ्याविरोधात तक्रार दाखल करून राजीनाम्यासाठी भाग पाडू असे धमकावले.’
न्यायाधीशांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे कारवाईबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. वकील अतुल कुमार यांना नोटीस बजावून अवमानाची कारवाई का सुरू करू नये, याबाबत खुलासा मागितला आहे. या घटनेनंतर तीन दिवसांनी म्हणजे ५ एप्रिलला कोर्टाने आरोपीला २२ महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच धनादेश न वठल्याप्रकरणी ६ .६५ लाख रुपये दंड भरण्याचे आदेशही दिले.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर वकिलांनी शिक्षा कमी करण्याची विनंती कोर्टाला केली होती. आरोपी हे ६३ वर्षांचे ज्येष्ठ नागरीक आहेत. ते निवृत्त सरकारी वकील असून त्यांना तीन बेरोजगार मुले आहेत, असे वकिलांनी कोर्टाला सांगितले. मात्र, कोर्टाने शिक्षा कायम ठेवली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!