“प्रशासनाने समस्येची कबुली दिली; मग कारवाई कधी?”
अमरावती – अविनाश गोंडाणे
बडनेरा : समता चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात साचणारे पावसाचे पाणी, उखडलेला रस्ता आणि नागरिकांना होणारा प्रचंड त्रास याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर आपल्या आज दि. २४ जून २०२६ रोजीच्या पत्राद्वारे वस्तुस्थिती मान्य केली आहे. मात्र, ही कबुली जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. विभागाने स्वतः मान्य केले आहे की रस्ता खालच्या पातळीवर असल्याने पाणी साचते, निचऱ्याची व्यवस्था नाही, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पाणी शिरण्याचा धोका आहे. मग प्रश्न असा आहे की ही परिस्थिती माहिती असूनही आजपर्यंत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी झोपेत होते का?
“प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे”, “निधीची प्रतीक्षा आहे” आणि “मान्यता मिळाल्यानंतर काम होईल” ही उत्तरे नागरिकांना आता मान्य नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात जनतेला चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतो, तर प्रशासन फक्त कागदोपत्री हालचाली करत राहते. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील परिसराची ही अवस्था असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. स्मारक परिसर जलमय होतो, नागरिक त्रस्त होतात, वाहतूक विस्कळीत होते; पण फोटोसेशन आणि उद्घाटनांमध्ये व्यस्त असलेल्या सत्ताधाऱ्यांना हे दिसत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.















Add Comment