संपादकीय

इतर लोकांसाठी मिळणारी रेती बुकिंग रात्रीतूनच खल्लास ! नेमकी रेती कुणाच्या घशात ?

धामणगाव रेल्वे –

रेती डेपो सुरु झाल्यास सर्व सामान्यांना सहजरित्या रेती उपलब्ध होईल असा गोड गैरसमज धामणगाव तालुक्यातील नागरिकांचा होता. मात्र रेती डेपो सुरु झाल्यापासून अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. घरकुल धारकांना निशुल्क जरी रेती मिळत असली तरी त्यामध्ये मातीमिश्रित रेतीसह दगडधोंड्याचा पसारा असतो तर कधी बुकिंग साईटच सुरु नसते असे एक ना अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असताना दि. २९ फेब्रुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान इत्तर लोकांसाठी सुरु झालेली रेती बुकिंग साईट हे १ मार्च ला सकाळीच उपलब्ध रेतीचा संपूर्ण स्टॉक बुक झाल्याने साईट बंद झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत रात्रीतूनच अंदाजे १३०० ते १४०० ब्रास रेती खल्लास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

             आता आपल्याला प्रश्न पडला असेल कि, रात्रीतूनच रेती बुक झाल्यास यात नवल काय? तर शासनामार्फत उपलब्ध रेती इतरांना सहजरित्या मिळावी म्हणून त्यासाठी बुकिंग ची सुविधा सेतू चालकांना दिली आहे. परंतु नियमाप्रमाणे सेतू केंद्र हे सायंकाळी ६ : ३० पर्यंतच सुरु ठेवावे लागतात. जेव्हा रात्रीचे सेतू केंद्रच सुरु राहत नाही तर इतका मोठा रेतीचा साठा रात्रीतूनच बुक झाला कसा? हा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. तर सर्वसामान्यांना घरकुल धारकाव्यतिरिक्त इत्तर लोकांसाठी बुकिंग ची साईटच कधी सुरु झाली आणि कधी बंद पडली हेच माहित नसल्याने नेमकी रेती बुक कुणी केली? आणि कुठल्या सेतू केंद्रातून ती बुक झाली हा संशोधनाचा विषय बनला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार धामणगावातील काही सेतू चालकांनाच इत्तर लोकांसाठी रेती बुकिंग ची साईट कधी सुरु झाली आणि कधी बंद पडली याची माहिती त्यामुळे त्यांच्या सेतू मधून एकही ब्रास रेती बुकिंग झाली नसल्याची माहिती प्राप्त आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वसामान्यांच्या हक्कावर डल्ला मारला कुणी हे शोधणे सुद्दा तेवढेच गरजेचे आहे.

            त्याकरिता आता सामान्य नागरिकांसह इतर संघटना आक्रमक पवित्रा घेऊन सदरच्या बेकायदेशीररित्या बुकिंग झालेल्या रेतीच्या चौकशीसाठी तहसीलदारांना घेराव घालणार असल्याची चर्चा जनसामान्यात आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!