अमरावती क्राईम

कुख्यात गुन्हेगार सुरज उर्फ ‘सावत्या’ ची टोळक्याकडून निर्घृण हत्या

अमरावती : प्रतिनिधी

शहरातील गुन्हेगारी विश्वात ‘सावत्या’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सूरज उर्फ सावत्या दिवाकर सावते (वय २५, रा. शेगाव) याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.३१) दुपारी ४ च्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी चाकूचे सपासप वार करून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेगाव रहाटगाव रोडवरील एका बारच्या मागील बाजूस घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, सावत्या शनिवारी दुपारी आपल्या एका मित्रासोबत शेगाव रहाटगाव रोडवरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान, दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक बारमध्ये प्रवेश करून सावत्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती तणावपूर्ण होताच सावत्या मागच्या गेटने पळून जाण्याचा प्रयत्नात होता. मात्र, आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मागील बाजूस असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये त्याचा पाठलाग केला व त्याच्या मानेसह शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार केले. आरोपी एवढयावरच थांबले नाही तर त्यानंतर एक मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकला. त्यानंतर तेथून आरोपी पसार झाले.
घटनेनंतर सावत्याच्या मित्रांनी नांदगावपेठ ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच प्रभारी ठाणेदार महेंद्र अंभोरे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ सावत्याला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावर डीसीपी सागर पाटील, एसीपी अरुण पाटील, गुन्हे शाखेचे पो.नि. गोरखनाथ जाधव, तसेच सीआययूचे पीआय आसाराम चोरमले यांनी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नांदगावपेठ पोलिस ठाण्यात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सावत्या गुन्हेगारी विश्वात होता सक्रिय
सावत्या हा अल्पवयीन असतानाच गुन्हेगारी विश्वात सक्रिय झाला होता. गाडगेनगरसह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते.एका प्रकरणातील शिक्षा भोगून नुकताच तो जेलमधून बाहेर आला होता, अशी माहिती आहे. त्याच्या हत्या प्रकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!