महाराष्ट्र

माजी उपसरपंचाला निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, विहिरीत बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप

जनसूर्या मीडिया

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत असून गावागावात कार्यकर्ते एकत्र येत आहेत. वार्ड आणि प्रभागतही नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. गेल्या ८ दिवसांपासून प्रचारसभांनी जोर धरला असून दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, गावात किंवा कार्यकर्त्यांच्या शेतात बैठकांचे व पार्ट्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांना एकत्र जमविण्यासाठी जेवणावळी बसल्या जात आहेत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात अशीच एका राजकीय कार्यकर्त्यांची मेजवाणी ठरली असता, दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत गावातील माजी उपसरपंचांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात एका राजकीय पक्षाने आयोजित केलेली पार्टी कार्यकर्त्याच्या जीवावर बेतली, या पार्टीसाठी आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रविवारी रात्री पार्टी आयोजित केली होती. यात जवळच्या पांझुर्णी गावातील माजी उपसरपंच गजानन काळे हे देखील सहभागी झाले होते. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. काहीतरी पडल्याचा आवाज येताच सगळे त्यांच्या दिशेने धावले. पडलेल्यांपैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. मात्र, गजानन काळे यांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज सकाळी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मात्र, या प्रकरणी गुन्हा अद्याप दखल करण्यात आलेला नाही. विहिरीत पडलेल्या व्यक्ती नशेत होत्या का, त्यांना कुणी धक्का दिला का, हा अपघात आहे की घातपात, अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीचा माहोल असताना एका राजकीय पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले असून घटनेच्या चौकशीची मागणी केली जात आहे
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!