धक्कादायक नागपूर

प्रियकराने घेतली प्रेयसीच्या चितेवर उडी – उपस्थितांनी चांगलाच चोपला

प्रेयसीच्या निधनानंतर प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

नागपूर : प्रतिनिधी

प्रेमासाठी तरुण पिढी काय करेल, काही नेम राहिलेला नाही. गळफास घेऊन जीवन संपविलेल्या प्रेयसीच्या चितेवर उडी घेत प्रियकरानेही जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
प्रेयसीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना मद्यधुंद प्रियकराने तिच्या चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने उडी मारण्याचा प्रयत्न करताच उपस्थित नागरिकांनी त्याला मागे खेचले व त्याला चोप दिला. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अनुराग राजेंद्र मेश्राम (वय २७, रा. हनुमान नगर , ता. पारशिवनी) असे या तरुणाचे नाव आहे. कामठी तालुक्यातील नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कन्हान नदी शांती घाट येथे सोमवारी (दि.९) ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मृत अंशिका नितीन खोब्रागडे (वय १९, रा. हनुमान नगर, ता. पारशिवनी) या युवतीचे त्याच परिसरात राहणाऱ्या अनुराग मेश्राम (२७) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेम प्रकरणात नैराश्य आल्याने अंशिका हिने रविवारी (दि.८) सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. अंशिकाच्या लहान बहिणीने वडील व आईला घटनेची माहिती देताच वडिलांनी शेजाऱ्याला बोलवून अंशिकाला खाली उतरवून कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्यावर सोमवारी (दि.९) दुपारी चार वाजता कन्हान नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना अनुराग याने पेटत्या चितेत उडी घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने पुन्हा चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी त्याला मागे खेचत मारहाण केली. मारहाणीत जखमी झाल्याने त्याला कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!