यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर असल्याने व सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. वर्ष २००७ मध्ये पावसाने जिल्ह्यातील ४८२ गावांत घातलेला कहर बघता यंदा जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण केली आहे.
जिल्ह्यात ३६१ गावांना पुराचा धोका असून ११ गावे मोठ्या नद्यांमुळे बाधित होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. सुमारे पाच लाख लोकसंख्येला पूरस्थितीचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्ह्यात एकूण १९८५ गावे असून वर्ष २००७ च्या सर्वेक्षणानुसार ४८२ गावांना पुराचा धोका आहे.
यामध्ये अमरावती, तिवसा, भातकुली, दर्यापूर, अंजनगावसुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे व धामणगावरेल्वे आदी तालुक्यांतील ३६१ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातून वर्धा, तापी या मोठ्या नद्यांसह पूर्णा, पेढी, पिली या नद्यांसह मेळघाटातील नद्यांना पूरस्थिती निर्माण होते.
मोठ्या नद्यांच्या पूरस्थितीने ११ तर लहान नद्या व नाल्यांमुळे २०६ गावे बाधित होण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थितीचा पाच लाख नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा तयार केली असून त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले. २४ जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकासह १६८ तालुकास्तरीय पथके तयार करण्यात आली आहेत.
पुरामुळे बाधित होणारी गावे, लोकसंख्या
एकूण गाव – १९८५, संभाव्य पूरबाधित गावे – ४८२, मोठ्या नद्यांमुळे बाधित गावे – ११, लहान नद्या व नाल्यांमुळे धोका – २०६, तात्पुरते निवारे – ६८६, बाधित होणारी लोकसंख्या – ५ लाख
Add Comment