अमरावती

अमरावतीत २२ वर्षीय तरुण डॉक्टरचा गूढ अंत; व्हिसेरा रिपोर्टनंतर उलगडा होणार!

आई-वडिलांनी दिली धक्कादायक माहिती

अमरावती प्रतिनिधी :- अविनाश गोंडाणे

अमरावतीत २२ वर्षीय बीएमएस डॉक्टराचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. औषधांच्या ओव्हरडोसचा संशय असून व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
नाशिक येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नुकतीच बी.ए.एम.एस. ची पदवी घेतलेल्या एका २२  वर्षीय तरुण डॉक्टराचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अमरावतीतून समोर आली आहे. या तरुण डॉक्टराचा मृतदेह उलटा अवस्थेत आढळला आहे. तसेच त्याच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा भयावह अवस्थेत तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

आदित्य रावटे असं मृत पावलेल्या तरुण डॉक्टरचं नाव आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत आदित्यला लहानपणापासूनच अपस्माराचा (फिट) त्रास होता. याशिवाय स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी तो स्वतःवरच काही औषधांचे प्रयोग करत उपचार घेत होता, अशी माहिती त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली आहे. याच औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा जीव गेला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

खोलीत भयावह अवस्थेत आढळला मृतदेह

आदित्य त्याच्या खोलीत उलटा अवस्थेत मृतदेह पडलेला आढळला आहे. तसेच त्याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचं दिसून आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, गुदमरल्यामुळे आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हा मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आदित्यचा मृत्यू गोरा होण्याच्या औषधांच्या विषबाधेमुळे झाला की अपस्माराच्या आजारामुळे? याचा खरा उलगडा व्हिसेरा तपासणी आणि सविस्तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होणार आहे. या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. लेकराच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. पुढिल तपास पोलीस अधिकारी करित आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!